Sun, Dec 15, 2019 05:58



होमपेज › Belgaon › खानापूर तालुका भारुड कलेनेे समृद्ध

खानापूर तालुका भारुड कलेनेे समृद्ध

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 21 2018 12:06AM



खानापूर : वासुदेव चौगुले

मराठीतील संत परंपरेला सामाजिक चळवळींचा वारसा आहे. संत एकनाथ, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यासारख्यांनी तत्कालीन अनिष्ट रुढी-प्रथांवर भजन आणि भारुडांच्या माध्यमातून कडाडून हल्ला चढविला. हीच समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचे काम खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक भजनी मंडळे पदरमोड करून करत आहेत. सध्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यात पहाटेच्या प्रहरी वासुदेव साद घालतो आहे. 

भारुड कलेला शासकीय पाठबळ मिळाल्यास लोकप्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून त्यांच्याकडून आणखी जोमाने काम होऊ शकते. अनेक वर्षांपासून अंध रुढी आणि परंपरांमध्ये गुरफटलेल्या ग्रामीण माणसाला डोळस भक्तीचा मार्ग दाखविण्यात संतांची भूमिका महत्त्वाची ठरली. संत एकनाथांनी लोकप्रिय केलेला भारुडाचा प्रकार आजही तितक्याच प्रभावीपणे आणि ताकदीने लोकजागृतीचे कार्य करताना दिसत आहे.

खानापूर तालुक्यात पूर्वीपासूनच गावची जत्रा, सार्वजनिक कार्यक्रम आणि ग्रामदेवतेच्या उत्सवप्रसंगी हमखास भारुडांचे आयोजन करण्याची प्रथा आहे. मात्र अलिकडच्या काळात मनोरंजनाची अधुनिक साधने उपलब्ध झाल्याने भजनी-भारुड प्रकाराला उतरती कळा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र ऑर्केस्ट्रा आणि डिजेवरील गोंगाटाला कंटाळलेल्या नागरिकांना पुन्हा जुनी भजनी-भारुडेच आपलीशी वाटू लागल्याने नव्या दमाची तरुण पिढीही भारुडांकडे वळत आहे.

आजघडीला तालुक्यातील कुपटगिरी, तिओली, होनकल, यडोगा, काटगाळी, लक्केबैल, बैलूर, मणतुर्गे, जळगे, कौंदल या गावांमध्ये भजनी-भारुड मंडळे कार्यरत आहेत. एका भजनी-भारुडाच्या पथकामध्ये वादक व कलाकार मिळून 25 ते 30 जणांचा समावेश असतो. यात्रा व उत्सव काळात देवासमोर रात्रभर जागर घालण्यासाठी,  धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी याचे आयोजन केले जाते.खानापूरची खासियत असलेली ग्रामीण बोली, संवादांमध्ये विनोदांची चपखल पेरणी आणि प्रसंगांच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर चढविण्यात येणारे हल्ले यामुळे आजच्या भजनी-भारुड चळवळीला विधायकतेची जोड मिळाली. काही भारुड पथकांमध्ये बाल कलाकारांचाही सहभाग असल्याने अशा पथकांचे सादरीकरण पाहण्यास नागरिक आवर्जून हजेरी लावतात.हुंडा पद्धत, स्त्री-शिक्षण, लिंगसमानता, नारीशक्तीचा महिमा, व्यसनमुक्ती या विषयांवर भारुडे सादर करुन विधायकता जपली जात आहे.