Mon, Aug 19, 2019 03:33होमपेज › Belgaon › येडिपुत्राला डावलल्याने खळ्ळखट्याक

येडिपुत्राला डावलल्याने खळ्ळखट्याक

Published On: Apr 25 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 1:10AMम्हैसूर : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना वरूणा मतदारसंघातून पक्षाने तिकीट नाकारल्याने संतप्त बनलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी म्हैसूरमध्ये थेट भाजप कार्यालयावरच हल्ला केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या मतदारसंघातून टी. बसवराजू यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी त्यांनी अर्जही भरला.कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत कार्यालयाच्या  खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन टायर जाळल्याने शहराच्या काही भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाहने रोखून धरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. 

वरूण मतदारसंघातूून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पुत्र डॉ. यतींद्र निवडणूक लढवित असून त्यांच्या तोडीचा उमेदवार म्हणून येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांना तिकीट देण्यात यावे, अशी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मागणी होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपासून विजयेंद्र यांच्या समर्थकांनी पक्षाकडे आग्रह धरला होता. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत विजयेंद्र यांना उमेदवारी मिळेल, अशी समर्थकांची आशा होती. मात्र, तिकीट वाटपाच्या अखेरच्या क्षणापर्यंत विजयेंद्र यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींकडून पसंती मिळाली नाही. त्यामुळे  विजयेंद्र यांचे समर्थक उद्विग्न झाले.

Tags : Karnataka Election, BJP, Amit Shah, Yeddyurappa