Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Belgaon › शिवराय पूजनाला आक्षेप

शिवराय पूजनाला आक्षेप

Published On: Apr 15 2019 1:52AM | Last Updated: Apr 15 2019 12:10AM
बेळगाव : प्रतिनिधी

मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचे धोरण राज्य सरकारकडून पदोपदी राबवले जाते. त्याच सरकारचे कर्मचारी निवडणूक अधिकारी म्हणून काम करतानाही मराठी भाषिकांना आडकाठी करण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी या कर्मचार्‍यांनी चक्‍क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करण्यास आक्षेप घेत मराठी भाषिक उमेदवारांकडे परवानगी दाखवण्याची मागणी केली. मात्र, मराठी उमेदवारांनीही आक्षेप झुगारून शिवाजी उद्यानात शिवरायांचे पूजन केले. 

युवा समितीच्या सात उमेदवारांच्या प्रचाराचे उद्घाटन रविवारी शहापुरातील छत्रपती शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्याचे नियोजन होते. त्यानुसार उमेदवार आणि कार्यकर्ते सकाळी 9 वा. उद्यानात पोहोचले; पण त्याआधीच उद्यानात पोहोचलेल्या निवडणूक अधिकार्‍यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करण्यास आक्षेप घेतला. उमेदवारांना  परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

खुलासाही अमान्य

अधिकार्‍यांच्या आक्षेपावर उमेदवारांनी खुलासा केला. ते म्हणाले, ‘बेळगाव शहरात आम्ही प्रचार करणार आहोत. त्यानुसार प्रचाराची आवश्यक परवानगी मिळविण्यासाठी शनिवारी आम्ही मनपामध्ये गेलो होतो. मात्र पुतळ्याची पूजा करण्यास कोणतीही परवानगी आवश्यक नाही, असे आम्हाला निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनीच सांगितले आहे.’

मात्र हा खुलासा अधिकार्‍यांना अमान्य झाला. निवडणूक अधिकार्‍यांची परवानगी आणा, त्यानंतरच पूजा करा, अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त बनलेल्या समिती उमेदवारांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. म. ए. समितीच्या उमेदवारांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार राजरोसपणे पूजा करत आहेत. त्यांच्याकडे परवानगीची विचारणा करण्यात येत नाही. फक्त मराठी उमेदवारांना प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न का करता, असा संताप व्यक्त करून कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करत   शिवपुतळ्याची पूजा केली. 

यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सचिव श्रीकांत कदम, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, आशुतोष कांबळे, नितीन आनंदाचे, सचिन केळवेकर, विनायक मोरे उपस्थित होते.

ती संघटना कोणती?

समिती उमेदवारांना पूजा करण्यापासून रोखण्यासाठी एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  अधिकार्‍यांची ढाल पुढे केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. हिंदुत्वाचा नगारा वाजवत मराठी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न करणार्‍याच संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिवरायपूजनाला आक्षेप का, असा प्रश्न विचारला जात आहे.

स्पीकरसह सामूहिक पूजनाला परवानगी आवश्यक : रुगी

मनपातील अधिकार्‍यांनी शिवपूजनासाठी परवानगीची गरज नाही, असे सांगितले असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी पूजनालाच आक्षेप घेतला. त्याबाबत दै. ‘पुढारी’ने कायदा नेमका काय सांगतो, हे जाणून घेण्यासाठी बेळगाव जिल्हा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी जगदीश रुगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पीकर लाऊन सामूहिक पूजन होणार असेल तर पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘वैयक्‍तिकरीत्या पुतळ्याचे पूजन करणे, हार घालून प्रचार प्रारंभ करण्यास पूर्वपरवानगीची गरज नाही. तसे करताना कोणी रोखले असल्यास संबंधित उमेदवार निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करू शकतात. मात्र पुतळा पूजनासाठी सामूहिकपणे जाणे, कार्यकर्त्यांची बैठक घेणे, सभा घेणे, लाऊड स्पीकर लावणे, कार्यकर्त्यांसाठी चहापान करणे आदींसाठी मात्र परवानगी घेणे, त्याचा खर्च सादर करणे बंधनकारक आहे.