Tue, Sep 17, 2019 04:16होमपेज › Belgaon › जाहिरात फलकातून कानडीकरणाचा वरवंटा

जाहिरात फलकातून कानडीकरणाचा वरवंटा

Published On: Feb 07 2019 1:18AM | Last Updated: Feb 06 2019 8:15PM
बेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागात एकीकडे प्रशासनाकडून कानडीकरणाचा वरवंटा फिरविला जात असताना, यामध्ये कंपन्यांच्या जाहिरातीची भर पडत आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडून करण्यात येणार्‍या जाहिरातीमध्ये कन्नड आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात येतो. जाहिरात फलकावरून मराठीला हद्दपार केले आहे. याविरोधात मराठी भाषिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडून आपल्या उत्पादनांची जाहिरात दुकाने, व्यापारी आस्थापने, सार्वजनिक ठिकाणी  करण्यात  येते.  या मागे  ग्राहकांना आकर्षित करून घेण्याचा उद्देश असतो. परंतु, सरकारच्या जाचक अटींमुळे 
जाहिरात फलकावरून मराठी गायब झाली आहे. 

बेळगाव शहरासह सीमाभागातील मराठी भाषिक भागावर हक्क सांगण्यासाठी कर्नाटक प्रशासनाकडून कन्नड भाषेचा आग्रह धरत असते. व्यापारी आस्थापने, दुकाने, सार्वजनिक संस्था यांचे फलक कन्नडमधून लावण्याची सक्ती करण्यात येते. कन्नड भाषेला डावलण्याचा प्रयत्न झाल्यास परवाना नाकारण्यात येतो. मध्यंतरी गुन्हा दाखल करण्याची तंबी देण्यात आली होती. यातून कन्नड भाषा मराठी भाषिकांवर ठसविण्याचा प्रयत्न होतो.

यामध्ये विविध उत्पादनांच्या जाहिरातींची भर पडली आहे. उत्पानाची जाहिरात करण्यासाठी दुकानदारांना कंपन्यांकडून नामफलक पुरविण्यात येतात. यावर कन्नड भाषेचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. त्याखालोखाल इंग्रजीला स्थान देण्यात येते. तर मराठी गायबच असते. मराठी भाषेतील अक्षरे जाहिरात फलकावर लिहिण्यात येत नाहीत. बेळगाव शहरासह खेड्यापाड्यात असा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यातून अनेक मराठीमोळी गावेदेखील कन्नड भाषिक समजण्यात येत आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांचा  ठसा यातून पुसला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. साधारणपणे ज्या गावात ज्या भाषेतील जाहिरात फलक असतील, त्यावरून तेथील भाषिकांचे अनुमान काढण्यात येते. बेळगाव परिसरातील शंभर टक्के मराठी भाषिक गावातून असणार्‍या कन्नड फलकामुळे संभ्रम निर्माण होत आहे.

उत्पादकांकडून उत्पादनाच्या जाहिरातीसाठी फलक उभारण्यात येतात. त्यामुळे संबंधित दुकाने, व्यापारी आस्थापने यांनी मराठीचा आग्रह धरल्यास संबंधित उत्पादकांकडून पूर्तता होण्याची शक्यता असते. परंतु, यासाठी आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex