Fri, Aug 23, 2019 17:29होमपेज › Belgaon › केके कोप्प, होसूरमध्ये ‘प्राप्‍तिकर’कडून छापे

केके कोप्प, होसूरमध्ये ‘प्राप्‍तिकर’कडून छापे

Published On: Apr 23 2019 1:33AM | Last Updated: Apr 23 2019 1:33AM
बेळगाव : प्रतिनिधी

केके कोप्प आणि सौंदत्ती तालुक्यातील होसूर येथे सोमवारी सकाळी दोघांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. दोघेही भाजपशी संबंधित असून, रोकड व सोने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. केके कोप्प येथे एका भाजप नेत्यावर छापा टाकून त्यांच्या घरातील 2 लाख रुपये व 30 तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतल्याचे समजते. हा नेता तालुका पंचायतशीही संबंधित आहे. 

सौंदत्ती तालुक्यातील होसूर येथील भाजपचे पदाधिकारी असलेल्या एकावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्यांच्याकडे फार मोठे घबाड मिळाले नसले, तरी रक्‍कम व काही तोळे सोने जप्त केल्याचे समजते. मतदानाच्या आदल्या दिवशीच ही कारवाई झाली. त्यामुळे मतदानाच्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाईल, अशी शंका प्राप्तीकर विभागाला होती असे मानले जाते.

याआधी गेले पंधरा दिवस प्राप्तीकर विभागाने काँग्रेस आणि निजद नेत्यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले होते. त्यामुळे प्राप्तीकर विभागावरही टीका होत होती. केंद्र सरकार आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असल्याची टीका खुद्द मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली होती. गेल्या आठवड्यात चिकोडी आणि शिरगुप्पीमध्येही प्राप्तीकर विभागाने दोन कंत्राटदारांवर छापे टाकले होते.