Sun, Dec 08, 2019 21:46होमपेज › Belgaon › नाट्याच्या क्लायमॅक्समध्ये राज्यपाल ठरणार निर्णायक

नाट्याच्या क्लायमॅक्समध्ये राज्यपाल ठरणार निर्णायक

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 12 2019 12:19AM
बंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील राजकीय घडामोडी पाहता राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरु शकते. त्यांच्या घटनात्मक निर्णयामुळे या नाट्याचा अंत होऊ शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. परिस्थिती पाहून तत्काळ अधिवेशन बोलवण्याची सूचना राज्यपाल विधानसभा सभापतींना करु शकतात. अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याचा आदेशही ते देऊ शकतात. राज्यातील राजकीय स्थिती बिघडली आहे. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. राज्यपाल त्यावर लक्ष ठेवून आहेत. सरकार अल्पमतात गेल्याचे दिसून येत आहे. अशावेळी ते सरकारला बहुमत सिद्ध करण्याची सूचना देऊ शकतात, असे मत माजी अ‍ॅडव्होकेट जनरल अशोक हारनहळ्ळी यांचे आहे.

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी परिस्थिती पाहून राजीनामा देणे योग्य आहे. आतापर्यंत त्यांनी पद सोडायचे होते. पण, आणखी वाट पाहात आहेत. त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

सध्या राजीनामासत्र सुरुच आहे. राज्यपालांकडे तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्याची सूचना देणे गरजेचे ठरते. आपल्या अधिकाराचा वापर करण्याची ही योग्य वेळ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे वकील के. व्ही. धनंजय सांगतात.

...तर राष्ट्रपती राजवट

शुक्रवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशन काळात बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास आणि त्यात सरकार अपयशी ठरल्यास ‘घटनात्मक पेच’चे कारण देऊन राज्यपाल राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस करु शकतात. यावेळी भाजपकडून सरकार स्थापन्याचा दावा केला जाऊ शकतो. तशी संधी भाजपला द्यायची की नाही? याचा निर्णय राज्यपाल घेतील. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सर्वप्रथम संधी देण्यात आली. पण, ते सरकार स्थापन करु शकले नव्हते. आता काँग्रेस-निजद आघाडीनेही बहुमत गमवले आहे. अशावेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारसीचा पूर्ण अधिकार राज्यपालांना असतो.