होमपेज › Belgaon › झुंजवाड लक्ष्मीयात्रेस अलोट गर्दी

झुंजवाड लक्ष्मीयात्रेस अलोट गर्दी

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 10:34PMखानापूर : प्रतिनिधी

झुंजवाड ता. खानापूर येथे 18 वर्षांनी होत असलेल्या ग्रामदेवता लक्ष्मीयात्रेला बुधवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. सूर्योदयाला 6 वा. 24 मिनिटांनी देवीचा विवाह सोहळा पारंपरिक विधींनी थाटात पार पडला. तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून उपस्थित असलेल्या तब्बल 25 हजारहून अधिक भाविकांच्या गर्दीने गावातील रस्ते तुडुंब झाले होते.

पहाटे पाचपासूनच वेगवेगळ्या मार्गाने भाविकांची रीघ झुंजवाडच्यादिशेने सुरु झाली होती. मुख्य रस्त्यावरील गाव आणि नंदगडपासून 3 किमी अंतरावर लक्ष्मीदेवीची दीड तपानंतर यात्रा होत असल्याने नंदगड, खानापूर, चापगाव, करंबळ या भागासह बिडी, कक्केरी, बेकवाड या भागातूनही हजारोंच्या संख्येने भाविक गावात दाखल झाले होते. परिवहनच्यावतीने खानापूर आणि बिडी दोन्ही मार्गावर सकाळपासूनच अतिरिक्त बस सुविधा सज्ज ठेवण्यात आली होती. 

भाविकांच्या वाहनांमुळे रहदारीची समस्या निर्माण होऊ नये. यासाठी गावच्या बाहेर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तरुण मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवकाची भूमिका बजावताना दिसून आले. मंगळवारी सकाळी हळदी समारंभापासून देवीच्या विवाह सोहळ्याच्या विधींना प्रारंभ करण्यात झाला होता. बुधवारी पहाटे तीनपासून भाविकांनी लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोर उपस्थित दर्शविली होती.  भरजरी वस्त्रे व अलंकार घालून महिलांनी पारंपरिक थाटात देवीच्या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.

विवाह सोहळ्यानंतर धार्मिक विधी पार पडले. भंडार्‍याच्या उधळणीत देवीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील विविध देवतांच्या मंदिरांना लक्ष्मीदेवीची भेट घडविण्यात आली. लक्ष्मीचा गजर आणि भंडार्‍याच्या उधळणीने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. आगामी नऊ दिवस हा यात्रोत्सव चालणार आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता यासंबंधी क. नंदगड ग्रा. पं ने विशेष दक्षता घेऊन नियोजन केल्याने भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.आ. अरविंद पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, राज्य बाल भवनच्या अध्यक्षा डॉ. अंजली निंबाळकर, प्रमोद कोचेरी, मुरलीधर पाटील आदींनी विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती.
Tags :Jhunjwād, Lakshmi,  yatra, alloted, crowd belgaon news