Sun, Dec 08, 2019 22:27होमपेज › Belgaon › उभ्या पिकांमध्ये फिरवला जेसीबी

उभ्या पिकांमध्ये फिरवला जेसीबी

Published On: May 18 2019 1:43AM | Last Updated: May 17 2019 10:40PM
बेळगाव : प्रतिनिधी

हलगा-मच्छे बायपाससाठी ठेकेदाराने काम जोमाने सुरू केले असून  शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांवरही जेसीबी फिरवण्यात येत आहे. शुक्रवार (दि. 17) रोजी शहापूर शिवारात वांगी आणि ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले असून शेतकरी सुभाष लाड यांना सुमारे 50 हजार रूपयांचा फटका बसला आहे.

सपाटीकरण जवळपास संपत आले असून लाल माती टाकून रस्ता कामाला सुरूवात करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शहापूर शिवारात ठेकेदाराने चार जेसीबी पाठवून सुभाष लाड यांच्या विहिरीशेजारील पिकांवर चालवण्यास सांगितले होते. ही माहिती मिळताच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले. शेतात पिके असतानाही जेसीबी का चालवत आहात, पिकांचे नुकसान करून काय मिळणार, भरपाई कोण देणार, असे सवाल करण्यात आले. त्याच दरम्यान पोलिस दाखल झाले. त्यांनी शेतकर्‍यांवर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. पण, शेतकर्‍यांनीही तीव्र विरोध करत जमीन घेताय, आता पिकेही खराब करत आहात, शेतकर्‍याने जगायचे कसे, असा सवाल करत पोलिसांनाही धारेवर धरले.

शेतकरी आक्रमक झाले असले तरी, पोलिस बंदोबस्तात जेसीबी चालवण्यात आला. त्यामुळे वांगी, ऊस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हलगा?मच्छे बायपास विरोधात शेतकर्‍यांनी वारंवार आंदोलन केले. तरी, रस्ता करण्यावर प्रशासन ठाम आहे. 

फेरसर्वेक्षणाच्या नावाखाली पुन्हा एकदा धूळ फेकण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना नोटीस न मिळताच त्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. यातच आता शेतात असलेल्या पिकांवरही जेसीबी फिरवण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

या रस्त्यात जमीन जाणारे शेतकरी हे अल्प भूधारक आहेत. त्यामुळे या शेतीवरच अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. आता ही जमीन रस्त्यामध्ये जात असल्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती पाहून कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही काही शेतकर्‍यांतून होत आहे.

पिके होती म्हणून..

रस्त्यासाठी सपाटीकरण करत असताना काही जमिनीत पिके होती. सुरूवातीला या रस्त्याला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध होता. तीन वेळा ठेकेदार आणि कामगारांना परत पाठवले होते. त्यानंतर रस्ता काम पुन्हा सुरू झाले. त्यावेळीही शेतकर्‍यांचा रोष वाढेल या भीतीपोटी पिके तशीच ठेवून इतर ठिकाणाहून काम करण्यात आले. आता शेतकर्‍यांचा विरोध मावळल्यामुळे पिकांतून जेसीबी चालवण्यात येत आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.