Sat, Dec 14, 2019 05:47होमपेज › Belgaon › निवडणुकीच्या शिवारात बळीराजा कुठं ?

निवडणुकीच्या शिवारात बळीराजा कुठं ?

Published On: Apr 16 2019 2:15AM | Last Updated: Apr 15 2019 10:33PM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात भौगोलिक भिन्नता असली  तरी शेतकर्‍यांची काळानुरूप मानसिकता न बदलल्याने येथील बळीराजा पारंपरिक जोखडात अडकला आहे. शासकीय पातळीवर पाठबळाची अपेक्षा असताना प्रत्येक निवडणुकीनंतर शेतकर्‍यांना भरघोस आश्‍वासने मिळतात.  केंद्र सरकारने ज्या शेतकरी हिताच्या योजना राबवल्या, त्यातून बेळगावच्या शेतकर्‍यांना कितपत लाभ झाला, हा चिंतनाचा विषय आहे.निवडणुकीआधी प्रत्येक  पक्षासमोर शेतकरी हा केंद्रस्थानी असतो. मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले जाण्याचाच अनुभव येत असतो. यंदाची निवडणूकही याला अपवाद नसल्याचेच शेतकर्‍यांशी झालेल्या संवादातून समोर आले आहे.

बेळगाव, निपाणी, चिकोडी, खानापूर भागात समाधानकारक पर्जन्यवृष्टी तर अन्य भाग दुष्काळमय. जिल्ह्यात अधूनमधून शेतकरी आत्महत्येची लक्षणेही डोकावत असतात. अनेक गावात शेतीला  आणि प्यायलाही पाणी मिळत नसल्याने येथील बळीराजा रोज संघर्ष करत आहे. कर्जमाफीसह विविध योजना शेतकर्‍यांनी जवळून पाहिल्या आहेत

जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणारा शेतकरी नकळत गटातटात विखुरला आहे. स्थानिक नेत्यांनी आपणास प्रत्येक गावात किती मते मिळणार, याचे आडाखे बांधलेले असतात. कोणता पक्ष शेतकरीप्रश्‍न सोडवू शकेल, याचा बारकाईने विचार कोणताच पक्ष करताना दिसत नाही. 

पिकांना हमीभाव, उसाची एफआरपी, दूधदर, कर्जमाफी आदी मुदृयाविषयी शेतकरीवर्गात खदखद आहे. सध्या शेतीचा खर्च वाढला आहे. बियाणे, खते, पेरणी, कापणी या सगळ्यांचे भाव दरवर्षी वाढत आहेत.पण त्या प्रमाणात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.