Wed, Feb 26, 2020 19:57होमपेज › Belgaon › आंतरराज्य ट्रक चोरी प्रकरणाचा छडा

आंतरराज्य ट्रक चोरी प्रकरणाचा छडा

Last Updated: Jan 23 2020 11:10PM
निपाणी : पुढारी वृत्तसेवा

घरासमोर व नेहमीच्या ठिकाणी लावण्यात येणार्‍या ट्रकसह अन्य वाहने चोरणार्‍या आंतरराज्य टोळीचा तपास लावण्यात निपाणी सर्कलच्या एलसीबी पथकाला यश आले आहे. पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करत या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला आहे. गुरुवारी अखेर ट्रक चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले. 

याप्रकरणी कल्लापा सुनील कदम (वय 24 रा. इंदिरानगर, अंकली, ता. चिकोडी) याला अटक करण्यात आली असून म्होरक्या जमीर इब्राहिम हारचीकर (वय 43, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) याला आम्ही अजूनही अटक केलेली नसल्याची माहिती उपअधीक्षक मनोजकुमार नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पथकाने कदम याच्याकडून 1 कोटी 78 लाख 40 हजार रूपये किंमतीचे 8 ट्रक, 2 टिप्पर, दोन कार, स्प्रे पेंटिंग मशीन असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा दै. पुढारीने सातत्याने पाठपुरावा केला.

दि. 10 डिसेंबर रोजी येथील गणेश खडेद यांच्या मालकीचा ट्रंक शहराबाहेरील एका गॅरेजमध्ये सोडण्यात आल होता. दरम्यान रात्री चोरट्यांनी सदर ट्रक लांबविला. याबाबत खडेद यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या मागदर्शनाखाली सीपीआय संतोष सत्यनायक, शहरचे उपनिरीक्षक कुमार हडकर, ग्रामीणचे बी. एस. तळवार, बसवेश्‍वर चौक स्थानकाचे बी. जी. सुबापुरमठ यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी पथकाने चालविला होता.

दरम्यान, खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने निपाणी चिकोडी रोडवर समाधी मठजवळ सापळा रचला. यावेळी अंकली येथून कल्लापा कदम चोरीचा ट्रक निपाणीच्या दिशेने घेऊन येत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण जमीर याच्या मदतीने निपाणी व परिसरातील काही ट्रक व इतर वाहने चोरल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता जमीर याने इतर 6 ट्रक महाराष्ट्रात विकल्याची कबुली दिली.

दरम्यान, जमीर याला इचलकरंजी एलसीबी पथकाने अटक केल्याचे आढळून आले. जमीरने विकलेल्या सहा ट्रकपैकी निपाणीतून चोरीस गेलेला आणखी  एक ट्रक असावा यासाठी जमीरला न्यायालयाच्या परवानगीने दुसर्‍या टप्प्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. गुरूवारी पथकाने कल्लाप्पाकडून ताब्यात घेतलेले सर्व ट्रक हे चोरीचे असून ते महाराष्ट्र व कर्नाटकातील आहेत. 

याबाबत अधिक चौकशी सुरू असून जमीरला ताब्यात घेतल्यानंतर ताब्यातील ट्रक व इतर वाहनांचे  मालक कळणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. कल्लाप्पाला सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

या कारवाईत एलसीबी पथकाचे हवालदार मारूती खानापन्नावर, राजू कोळी, राजू दिवटे, उदय कांबळे, एम. ए. तेरदाळ, आनंद पांडव, मारूती कांबळे, पोपट ऐनापुरे आदींनी सहभाग दर्शविला. गेल्या तीन दिवसांपासून एलसीबी पथकाने तीन दिवस आणी तीन रात्री जागून कदम याला गजाआड केले.

जिल्हा पोलिसप्रमुखांकडून अभिनंदन

निपाणी एलसीबी पथकाने पहिल्यांदाच  मोठ्या गंभीर  प्रकरणाचा तपास करून 1 कोटी 78 लाख 40 हजारचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील एलसीबी पथकाकडून पहिल्यांदाच सर्वात मोठी कारवाई झाल्याने जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी निपाणी पोलिस सर्कलसह एलसीबी पथकातील कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.