Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › पैसे वाटपाचे नवनवे उपाय

पैसे वाटपाचे नवनवे उपाय

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 11:33PMबंगळूर : प्रतिनिधी

मतदारांना ऑनलाईन, मोबाईल पर्स, ई?पेमेंट यासारख्या आधुनिक पद्धतीच्या माध्यमातून पैशांचे वाटप करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले असून याविरोधात उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती  केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्‍त ओमप्रकाश रावत यानी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी बंगळुरात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने पाहणीनंतर पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्‍त रावत म्हणाले की, मतदारांना पैसे वाटपासारखा गैरप्रकार  रोखणे हे आयोगासमोर मोठे आव्हान आहे. उघडपणे पैसे वाटप करणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे ऑनलाईनद्वारे मतदारांना पेेमेंट होत असल्याच्या तक्रारी आहेत. पोलिस वाहनांतून अवैध रोकडची वाहतूक करण्यात येत असल्याची तक्रार माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आयोगाकडे केली असल्याचे रावत यांनी सांगून याची चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हणाले.

कर्मचार्‍यांकडून सरकारी यंत्रणेचा  गैरवापर करण्यात येत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.  काही मतदारसंघांत महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी सरकारकडून अनुदान वितरण करण्यात येते तर काही  ठिकाणी सरकारी वाहनांचा दुरुपयोग होत आहे. मंडळ? महामंडळांचे अध्यक्ष, सरकारचे सल्लागार मतदारांची मने वळवित असल्याच्या  तक्रारीही आहेत. या तक्रारींची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून गैरप्रकार रोखण्यासाठी  उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

दूरदर्शनवरून राजकीय नेत्यांच्या प्रचाराचे प्रकार घडत असतात. त्यावर आवर घालण्याचा प्रयत्न आयोगाचा असेल. यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी आहे, यावर विचार करण्यात येत आहे.  निवडणूक मुक्‍त वातावरणात व शांततेत होण्यासाठी केंद्रामार्फत निमलष्करी दलाची व्यवस्था करण्यात आली आहे. अलीकडेच 140 पथके राज्यात दाखल झाली आहेत.  निवडणुकीवेळी कायदा? सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी जादा कुमक मागविण्यात येणार आहे.

Tags :Innovative, measure, allocation, money,belgaon news