Thu, Dec 12, 2019 22:13होमपेज › Belgaon › ईमानदारीच्या बेकायदेशीर धंद्यात बेईमानांची घुसखोरी

ईमानदारीच्या बेकायदेशीर धंद्यात बेईमानांची घुसखोरी

Published On: Jul 23 2019 1:17AM | Last Updated: Jul 24 2019 1:39AM
बेळगाव : प्रतिनिधी

‘यहाँ तो बेईमानी का धंदा भी  इमानदारीसे करना पडता है’  हिंदी चित्रपटातील हा गाजलेला डायलॉग. बेकायदेशीर असला, तरी मटका धंदाही इमानदारीने चालतो, हे मटका बुकींसह तो चालवणार्‍यांना व अट्टल मटका बहाद्दरांना पक्‍का ठाऊक आहे. परंतु, मुंबई मटका बंद झाल्यानंतर स्थानिक सिंडिकेटने इमानदारीचा हा धंदा कधीच बासनात गुंडाळला आहे.  त्यामुळे मटका खेळणार्‍यांची या सिंडिकेटने चक्क फसवणूक सुरू केली आहे. परंतु, याची कल्पना मटक्याच्या आहारी गेलेल्यांना अजिबात नसल्याचे दिसून येते. 

मुंबईचा पूर्वाश्रमीचा मटकाकिंग रतन खत्री अथवा आताचे सावला  पिता-पुत्र असोत. ते वर्षानुवर्षे मटका चालवतात. हा व्यवसाय बेकायदेशीर आहे, यात दुमत नाही. परंतु, या धंद्यातही विश्‍वासार्हता आणि प्रामाणिकपणाला अत्यंत महत्त्व आहे. बुकीने एका चिठ्ठीवर लिहिलेल्या दोन क्रमांकाच्या आधारावर आकडा लागल्यास त्याला लाखो रूपये कसलीही कुरकूर न करता दिले जातात. इतका विश्‍वास खेळणार्‍याला आणि मटका घेणार्‍यालाही असतो, हे पूर्वीचे आणि पट्टीचे मटका खेळणारे मान्य करतात. 

प्रामाणिकपणा बासनात 

या विश्‍वासार्हतेलाच तडा जाईल, असा प्रकार स्थानिक सिंडिकेटने सुरू केला आहे. रोज लाखो रूपये गोळा करणार्‍या या सिंडिकेटकडून नियोजनबद्धरित्या फसवणूक सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येते. पूर्वीपासून मुंबई-कल्याण ओसी अर्थात ओपन-क्‍लोज मटक्याची रक्कम जमा केल्यानंतर जेव्हा आकडा बाहेर पडत होता तो लॉटरी पद्धतीने काढला जायचा. मटका लावणारे 1 ते 100 पर्यंत कोणत्याही आकड्यावर रक्कम लावत असत. त्यापैकी एक आकडा जेव्हा काढला जायचा तो एकूण चिठ्ठ्यांमधील एक अथवा दोन चिठ्ठ्या उचलून आकडा जाहीर केला जात असे. त्यामुळे कोणत्या आकड्यावर कितीही रक्कम लागू ती प्रामाणिकपणे दिली जायची. परंतु, स्थानिक सिंडिकेटने नेमका यालाचा फाटा दिल्याचे समजते. 

सिंडिकेटकडून अशी फसवणूक 

स्थानिक सिंडिकेट रोज 60 लाखांहून अधिक रक्कम जमा करते. ही रक्कम  जमा झाल्यानंतर सर्व मुख्य बुकी एकत्रित जमतात. आकड्यांचा तक्ता   व त्यावर लावण्यात आलेली रक्कम याचा संपूर्ण एकत्रित हिशेब करतात. दिवसभरात 1 ते 100 आकड्यांपैकी कोणत्या आकड्यावर सर्वाधिक व सर्वात कमी रक्कम लावलेली आहे, याचा तक्ता पूर्ण करून घेतात. यानंतर ज्या अंकावर सर्वात कमी रक्कम लावलेली आहे, तो अंक त्या दिवशीचा आकडा म्हणून जाहीर केला जात आहे. 

मटका खेळणार्‍यांची फसवणूक

मटक्याच्या आहारी गेलेले असंख्य लोक रोज मटका खेळतात. सलग चार-पाच वेळा आकडा लावल्यानंतर एकदा तरी लागतो, असा नेहमी मटका खेळणार्‍यांचा अनुभव आहे. परंतु, अलिकडे स्थानिक मटका दहावेळा लावला तरी का लागत नाही? हेच कळत नव्हते. याचे गुपीत आता कळाले, असे एका मटका बहाद्दराने सांगितले. यावरून ही तर 
आमची चक्क फसवणूक करत असल्याची तिखट प्रतिक्रियादेखील त्याने व्यक्त केली. 

तुम्हीच ठरवा, खेळायचे की नाही?

यापूर्वी जेव्हा आकडा लावला जात होता, तेव्हा चार-पाच वेळा रक्कम गेल्यानंतर किंवा अधिकाधिक सात-आठवेळा रक्कम गेल्यानंतर एकदा तरी आकडा लागायचा. परंतु, अलिकडे आकडा लागण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे, असा अनेक मटकाबहाद्दरांचा अनुभव आहे. जर मटका घेणारे आणि त्यांना साथ देणारे रोज लाखो रूपये कमवत असतील आणि आपली मात्र महिनो न् महिने रक्कम जातच असेल, तर अशा फसविणार्‍या सिंडिकेटची आणखी किती भर करायची. त्यामुळे मी तर मटका लावणे बंद करणार आहे, तुम्हीही ठरवा, खेळायचे की नाही. ज्याने मटक्यावर चार महिन्यात दोन लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. त्याची ही बोलकी प्रतिक्रिया होणार्‍या फसवणुकीबाबत बरेच काही सांगून जाते.