Sun, Dec 15, 2019 06:13होमपेज › Belgaon › भारत ‘अ’विरुद्ध श्रीलंका ‘अ’ यांच्यात रंगणार 3 सामने

बेळगावात आजपासून वन-डेंचा थरार

Published On: Jun 06 2019 1:34AM | Last Updated: Jun 06 2019 1:34AM
बेळगाव : प्रतिनिधी

ऑटोनगर कणबर्गी येथील केएससीए मैदानावर गुरुवारी सकाळी 9 वाजता भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ संघात पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. बेळगावकरांना आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. 6, 8 व 10 जून रोजी हे सामने होणार असून, क्रीडाप्रेमींनी याचा आनंद लुटावा, असे आवाहन मुख्य आयोजक अविनाश पोतदार यांनी पत्रकार परिषदेत केले. 

बीसीसीआयचे अधिकारी राहिल ख्वाजा म्हणाले, भारत व श्रीलंका सामना चुरशीचा होणार आहे. कारण, दोन्ही सामन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग आहे. भारतीय संघात 9 नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे या पहिल्या अनौपचारिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही संघ बेळगावात दाखल झाले असून, बुधवारी सकाळी भारतीय खेळाडूंनी मैदानावर सराव केला. दुपारनंतर श्रीलंका खेळाडूंनी सराव केला. इशान किशन भारताचे नेतृत्व करणार आहे. पंकज धरमाणी क्रिकेट सामन्यांचे थेट सारांश कथन करणार असून, पंच म्हणून खालिद सय्यद व निखिल पटवर्धन काम पाहणार आहेत. ऑनलाईन स्कोअरबोर्डचे काम बी. एस. व्यंकटेश व बी. एस. जयकुमार पाहतील. व्हिडीओ चित्रीकरणाची जबाबदारी किरण कुतर्डेकर यांच्यावर राहील, अशी माहिती त्यांनी दिली. 

एकूण पाच सामन्यांची मालिका असून, बेळगावात तीन आणि हुबळीत दोन सामने होणार आहेत. ऑटोनगर येथील मैदानावर दोन्ही संघांत  6,  8 आणि 10 जून रोजी हे तीन सामने रंगणार आहेत. 

मे महिन्यात या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला डावाने धूळ चारली होती. हुबळी येथील नेहरू स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामनाही भारताने जिंकून श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला. त्यामुळे आता एकदिवसीय सामन्यांत काय होणार? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

 भारत ‘अ’ संघ असा : इशान किशन (कर्णधार), रिकी भुई, शुभमन गिल, श्रेयस गोपाल, मयंक मार्कंडेय, दीपक हुडा, पी. एस. चोप्रा, संदीप वॉरिअर, तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, इशान पोरेल, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अनमोलप्रीत सिंग.

 श्रीलंका ‘अ’ संघ असा : आशान प्रियंजन (कर्णधार), संगीथ कुरे, निरोशन डीकवेला, दासून शंका, स्नेहन जयसूर्या, सदीरा समरविक्रमा, भनुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, कामिंदू  मेंडिस, पथुथ निसांका, लाहिरू कुमारा, इशान जयरत्ने,  असिथ फर्नांडो, अखिल धनंजया, लक्षण संदकन.