बंगळूर : प्रतिनिधी
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन दिवस राहिले असताना हासन आणि मंड्या येथे प्राप्तिकर छापे घालण्यात आले. मंत्री रेवण्णा आणि सी. एस. पुट्टराजू यांच्या निकटवर्तीयांच्या निवासात तपास करण्यात आला.
मतदानाला दोन दिवस आहेत. त्यामुळे मतदारांना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे आणून ठेवल्याची माहिती प्राप्तिकर अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार कर्नाटक-गोवा संयुक्त प्राप्तिकर पथकाने हासनमधील सहाजणांवर छापे घालून तपास केला. डीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष होनवळ्ळी सतीश, होळेनरसीपूर ता. पं. माजी अध्यक्ष न्यामनहळ्ळी अनंतकुमार, हरदनहळ्ळीतील पापण्णी, कंत्राटदार कार्ले इंद्रेश, विधान परिषद माजी सदस्य पटेल शिवराम यांच्या निवासांवर छापे घालण्यात आले. मंड्या, हासन आणि म्हैसूर येथील कंत्राटदारांवर प्राप्तीकर अधिकार्यांनी करडी नजर ठेवली आहे. एकूण 15 अधिकार्यांनी तपास केला.
मंत्री पुट्टराजू यांचे नातेवाईक तिम्मेगौडा यांचे निवास, पेट्रोल पंप, कार्यालय, मद्दूर येथील जि. पं. अध्यक्षा नागरत्ना यांचे पती एस. पी. स्वामी यांचे औद्योगिक परिसरातील निवासावर छापे घालण्यात आले.
आगामी दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार असल्याचा सुगावा प्राप्तीकर अधिकार्यांना लागला. त्यानुसार छापे घातले.