बंगळूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी पूर्ण केली असून सुमारे चार हजार पानी आरोपपत्र तयार केले आहे. महिनाअखेरीस संशयितांविरुद्ध न्यायालयात ते दाखल करण्यात येणार आहे. बेळगावच्या भरत कुरणेसह एकूण 17 जण या हत्येमध्ये संशयित आहेत. विचारसरणीतील मतभेद हेच हत्येमागील मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या चौदा महिन्यांत बेळगावसह राज्यातील विविध ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील काही भागांत एसआयटीने तपास केला.
मे महिन्यात 650 पानांचे पहिले आरोपपत्र एसआयटीने दाखल केले होते. त्यानंतर चौकशी पुढे सुरू ठेवली आणि हत्येचे महाराष्ट्र, गोवा कनेक्शन उलगडले. संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी हत्येचा कट आखल्याचे तपासावेळी दिसून आले. दुसर्या टप्प्यात महत्त्वाचे धागेदोरे एसआयटीला मिळाले. महाराष्ट्रातील अमोल काळे हा हत्येमागील मास्टरमाईंड असल्याचे उघडकीस आले. या विविध माहितीसह आणखी काही गुप्त माहिती आरोपपत्रात नमूद असणार आहे.संशयितांविरुद्ध कोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी संशयितांची चौकशी करण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे 23 किंवा 25 रोजी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.
संशयित कोण?
अमोल काळे (मास्टरमाईंड), परशुराम वाघमारे (शूटर), गणेश मिस्कीन (मोटारसायकलचालक), अमित बद्दी (मोटारसाकलस्वाराचा सहायक), अमित देगवेकर (आर्थिक मदतीची जबाबदारी), भरत कुरणे (शस्त्र प्रशिक्षणासाठी आश्रय), राजेश बंगेरा (शस्त्रास्त्र प्रशिक्षक), शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांच्यासह 17 संशयित आहेत.