Mon, Dec 09, 2019 11:01होमपेज › Belgaon › दंशानंतर जखमी तरुण अजगरासह रुग्णालयात

दंशानंतर जखमी तरुण अजगरासह रुग्णालयात

Published On: Jun 24 2019 1:28AM | Last Updated: Jun 24 2019 12:57AM
कारवार : प्रतिनिधी

सापाला पाहून अनेकांची भीतीने गाळण उडते. चुकून तो चावलाच तर अर्धा जीव भीतीनेच जातो. अशा स्थितीत तरुणाने हातात साप घेऊन रुग्णालय गाठल्याची घटना भटकळ तालुक्यातील चौथनी येथे घडली. व्यंकटरमण नायक असे अजगर चावलेल्याचे नाव आहे.

दोन दिवसांपासून या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे तळ्यातून अजगर बाहेर येत असल्याचे व्यंकटरमणासह त्याच्या मित्रांनी पाहिले. सर्वांनी तेथील आजूबाजूच्या लोकांना सतर्क केले. अजगर पकडून तो वन खात्याच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू झाले. अजगराला पकडण्यासाठी गेलेल्या व्यंकटरमणला काही कळण्याआधीच दंश झाला.

दंशामुळे असह्य वेदना होत असल्या तरी न घाबरता त्याने मित्रांच्या साहाय्याने तो पकडला. सर्वांनी त्या अजगरासह सरकारी रुग्णालय गाठले. त्यांना सापांच्या जातीविषयी अज्ञान असल्याने त्यांनी रुग्णालयात अजगर नेला. तेथील डॉक्टरांना तो दाखवला आणि उपचार करावयास सांगितले. डॉक्टरांनी तत्काळ जखमीवर उपचार केले. सध्या व्यंकटरमणचे आरोग्य धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अजगर सापडला आणि त्याने दंश केल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अनेकजण रुग्णालयाकडे गेले. मोठी गर्दी झाल्याने ‘साप, साप’ अशी एकच चर्चा रुग्णालय आणि गावाच्या परिसरात दिवसभर सुरु होती. डॉक्टरांनी उपचार सुरु केल्यानंतर व्यंकटरमणच्या मित्रांनी सदर अजगर वन खात्याच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द केला.