Mon, Dec 09, 2019 11:33होमपेज › Belgaon › 107 व्या वर्षीही ‘त्या’ सांगतात आंबेडकरांच्या आठवणी !

107 व्या वर्षीही ‘त्या’ सांगतात आंबेडकरांच्या आठवणी !

Published On: Apr 14 2018 1:52AM | Last Updated: Apr 14 2018 1:51AMचिकोडी : काशिनाथ सुळकुडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती साजरी होत आहे. या महान नेत्याला पाहिलेल्या, जाणलेल्या आणि त्यांच्यासमवेत कार्य केलेल्या व्यक्‍ती दुर्मीळ आहेत. अशीच एक 107 वर्षीय वृध्द महिला  म्हणजे करोशी येथील जिगनबी बापूलाल पटेल होय. त्यांच्याविषयी थोडक्यात....

चिकोडी तालुक्यातील करोशी येथील जिगनबी पटेल आजही डॉ. आंबेडकरांच्या आठवणी जिवंत करतात. जिगनबी बापूलाल पटेल यांचे सासर करोशी असून मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड आहे. औरवाड येथील जिगनबींचे वडील गौसदादे पटेल यांच्यात व एका मंदिर व्यवस्थापन कमिटीत जमिनीचा वाद होता. हा खटला चालविण्यासाठी मुंबई हायकोर्टाचे सुप्रसिध्द वकील डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1927 साली औरवाड येथे त्यांच्या घरी 15 दिवस राहिले. यावेळी जिगनबी 9 वर्षांच्या तर डॉ. आंबेडकर 36 वर्षांचे होते.

चिकोडीसह, बेळगाव, धारवाडपर्यंतचा भाग मुंबई प्रांतात होता. चिकोडीतील न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड, शिरोळ, गडहिंग्लजसह अनेक गावांचा समावेश होता. यामुळे जिगनबींचे वडील गौसदादे यांचा वाद सोडविण्यासाठी औरवाडहून  डॉ.आंबेडकर चिकोडी न्यायालयात अनेकदा आले.

औरवाडमध्ये डॉ. आंबेडकरांची राहण्याची व्यवस्था पटेल यांनी घरीच वाड्यात  केली होती. जिगनबी स्वत: आंबेडकरांना जेवणाचे ताट, पाणी देण्यासह सर्व सोय करीत असे. त्यांनी या महापुरुषाला जवळून पाहिले. सध्या 107 वर्षांच्या जिगनबी यांची दृष्टी उत्तम आहे. त्यांना स्वच्छतेचा  छंद असून त्या नेहमी घर व अंगण स्वच्छ ठेवतात. त्यांचा मोठ्या मुलाचे निधन झाले असून एक मुलगा, तीन मुली आहेत.
जिगनबी आजदेखील निरोगी, तंदरुस्त असून डॉ. आंबेडकरांबाबत तासन् तास जुन्या स्मृती मांडताना कंटाळत नाहीत. त्यांच्या भेटीसाठी आजही खूप दूरवरून लोक येतात. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, आरपीआयचे प्रमुख, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, सा. रे. पाटील, आ. हसन मुश्रीफसह अनेक नेत्यांनी भेट दिली आहे. आंबेडकरांचे नातू प्रकाश यांनीही त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी चिकोडी सभेत त्यांचा सत्कार केला होता.
सांगलीतील आंबेडकर जयंती कार्यक्रमास दोन वेळा प्रमुख पाहुण्या म्हणून जिगनबींना बोलावून सत्कार  केला आहे. तासगाव, जयसिंगपूरसह अनेक ठिकाणी आंबेडकर जयंतीसह अनेक कार्यक्रमांना त्यांना आमंत्रित  करण्यात येते.


“डॉ. आंबेडकर यांचे राहणीमान अत्यंत साधे व सरळ होते. डॉ. आंबेडकर आपल्याला मुन्नी नावाने आदराने हाक मारायचे. आपण त्यांना जेवणाचे ताट, पाणी देत होते. आपण सर्व हिंदू-मुस्लिम गुण्या गोविंदाने राहावे, असे ते नेहमी सांगत होते.”
जिगनबी पटेल 


“आपल्या आईने आम्हाला बालपणापासून डॉ. आंबेडकरांचे विचार सांगितले. आईला अनेक कार्यक्रमांमध्ये बोलावून त्यांचा सत्कार केला जातो. अशा आईच्या पोटी जन्म घेतल्याचा सार्थ अभिमान आहे.”
अब्दुलमुनाफ पटेल, आजीचा मुलगा.
Tags :In the 107th year Ambedkar's memories! ,belgaon news