Sat, Sep 21, 2019 06:14होमपेज › Belgaon › ‘एसीबी’च्या छाप्यात कोट्यवधींचे घबाड!

‘एसीबी’च्या छाप्यात कोट्यवधींचे घबाड!

Published On: Jun 13 2019 1:31AM | Last Updated: Jun 13 2019 1:31AM
बंगळूर : प्रतिनिधी

बेळगावसह कारवार, बळ्ळारी व मंगळूर अशा चार जिल्ह्यांमध्ये बुधवारी दिवसभरात एसीबीने (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो तथा लाचलुचपत विभाग) 11 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईमध्ये कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे उघडकीस आले आहे. कर्नाटक विद्यापीठ धारवाडमधील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक, जोयडा आणि बळ्ळारीतील दोन सहायक कार्यकारी अभियंते एसीबीच्या जाळ्यात अडकले. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या सर्वच ठिकाणी बेहिशेबी मालमत्तेची मोजदाद सुरू होती. 

धारवाड विद्यापीठाचे प्रा. कल्‍लप्पा होसमनी, कारवार जिल्ह्यातील जोयडा उपविभागातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंते उदय छब्बी, मंगळुरातील खाण व भू विज्ञान खात्याचे साहाय्यक अभियंते महादेवप्पा या अधिकार्‍यांच्या  निवास, कार्यालय अशा एकूण 11 ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात आले.

या तिघांविरोधात बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याबाबत तक्रारी होत्या. रोख रक्कम, दागिने, भूखंड, ऐषोरामी वस्तू, महागडी वाहने, बंगला, जमीन आदींबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी अधिकार्‍यांनी केली. सायंकाळी उशिरापर्यंत तपास सुरुच होता. कल्‍लाप्पा होसमनी याआधी विद्यापीठाचे कुलसचिव होते. भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांना रसायनशास्त्र विभागात नियुक्‍त करण्यात आले होते.
होसमनी यांचे विद्यापीठातील कार्यालय, धारवाडमधील घर तसेच संबंधित इतर चार ठिकाणी तपास करण्यात आला. जोयडा येथील छब्बी व महादेवप्पा यांच्या निवासात आणि कार्यालयासह इतर काही ठिकाणी छापे घालण्यात आले.

या कारवाईबाबत सविस्तर माहिती दोन दिवसांत जाहीर होईल, असे ‘एसीबी’ अधिकार्‍यांनी कळवले आहे.

सहायक कार्यकारी अभियंत्यावर कारवाई 

जोयडा सार्वजनिक बांधकाम उपविभागात सहायक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले उदय छब्बी यांच्या घरावर बुधवारी एसीबीने छापा टाकला. एसीबी  पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली भाग्यनगर व दांडेली येथे छब्बी  यांच्या घरासह चार ठिकाणी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी कारवाई करण्यात आली.छब्बी यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. 

कारवारचे उपअधीक्षक गिरीश यांच्या पथकाने भाग्यनगर सहावा क्रॉस येथील सृष्टी कॉलनीमध्ये छब्बी यांच्या घरावर छापा टाकला. याशिवाय जोयडा येथील त्यांचे कार्यालय, ज्या विभागाचे ते प्रभारी म्हणून काम पहात होते, त्या दांडेली  नगरपालिका कार्यालयातील कक्ष, त्यांचा भाऊ व आई राहात असलेल्या दांडेली येथील राघवेंद्र स्वामी मठ रस्त्यावरील घरावर छापा टाकला. यामध्ये स्थावर व जंगम मालमत्तेची कागदपत्रे, रोख रक्कम व दागिने मिळाल्याचे सांगण्यात आले.