Mon, Jan 20, 2020 09:23होमपेज › Belgaon › अवैध मद्य वाहतुकीला अबकारीचा लगाम

अवैध मद्य वाहतुकीला अबकारीचा लगाम

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 8:49PMखानापूर : वासुदेव चौगुले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नजीकच्या गोवा राज्यातून मद्याची अवैध वाहतूक करण्याच्या प्रकारांना ऊत येतो. कर्नाटकच्या तुलनेत स्वस्तात मिळणार्‍या मद्याची चोरट्या मार्गाने जिल्ह्यात अवैध वाहतूक करण्याचे प्रमाण वाढीस लागते. मात्र यावेळी निवडणूक विभागाने केवळ अबकारी प्रकरणांसाठी स्वतंत्र एमसीसी पथकाची स्थापना करुन गोव्याला जोडणार्‍या मार्गांवर चोवीस तास गस्त सुरु ठेवल्याने अवैध मद्य वाहतुकीला लगाम बसला आहे.

निवडणुकीच्या काळात सर्वत्र मद्याच्या मागणीत वाढ होते. कर्नाटकातील मद्याच्या दराच्या तुलनेत गोव्यातील मद्य निम्म्या किमतीमध्ये मिळते. मात्र कर चुकवून अवैधरितीने गोवामेड मद्याची राजरोसपणे वाहतूक केली जाते. त्यासाठी खानापूर तालुक्यातील जंगलभागातून गेलेल्या आडवाटांचा वापर केला जातो. या कारणामुळे निवडणूक विभागाने अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांना डोळ्यात दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यापासून अबकारी खात्याला काटेकोरपणे वाहनांची झडती घेण्याबरोबरच महामार्गावरुन नियमित गस्त घालण्याची सूचना करण्यात आली आहे. कर्नाटकातून गोव्याला जोडणारे चारही महत्वाचे मार्ग खानापूर तालुक्याच्या हद्दीतून जातात. परिणामी हेम्माडगा-अनमोड, जांबोटी-चोर्ला, लोंढा-रामनगर  आणि   धारवाड-रामनगर-अनमोड या महामार्गांवर कडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

कर्नाटकच्या सीमेवरील सुरल याठिकाणी गोवामेड मद्य उपलब्ध असल्याने बेळगावहून त्याठिकाणी जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. महामार्ग सोडून अनेकांना आडवाटाही माहीत असल्याने चोरट्या मद्य वाहतुकीसाठी सुरलला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या मार्गावरच अबकारी पथक विशेष लक्ष ठेवून आहे.

वास्तविक याच जांबोटी-चोर्ला मार्गावर वर्षभरात सर्वाधिक अबकारी गुन्ह्यांची नोंद होते. ही पार्श्‍वभूमी ध्यानात घेऊन गोवामेड मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी निवडणूक विभागाने अबकारीला दिवस-रात्र कामाला जुंपले आहे. याकामी एमसीसी (आदर्श आचारसंहिता पालन समिती) च्या देखरेखीखाली स्वतंत्र भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्यांना रोजच्या कारवायांची निवडणूक अधिकार्‍यांना माहिती द्यावी लागत आहे.