Mon, Jan 20, 2020 09:24होमपेज › Belgaon › ‘आयएमए’चे सात संचालक अटकेत

‘आयएमए’चे सात संचालक अटकेत

Published On: Jun 13 2019 1:31AM | Last Updated: Jun 13 2019 12:06AM
बंगळूर : प्रतिनिधी

शेकडो कोटींच्या फसवणूक प्रकरणी आयएमए कंपनीच्या सात संचालकांना अटक करण्यात आली आहे. उत्तर विभागाचे पोलिस उपायुक्‍त राहुल कुमार यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपवण्यात आली आहे.  तर अंमल संचालनालयाने स्वयंप्रेरित तक्रार दाखल करुन तपास करण्यचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

निजामुद्दिन, नासीर हुसेन, नवीद अहमद, अर्शद खान, वासीम, दादापीर, अन्वर पाशा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी करण्यात येत असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटकेतील संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयएमएच्या एकूण सोळा कंपन्या आहेत. याविषयी अधिक माहिती घेण्यात येत आहे.

दरम्यान, आयएमए घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. केवळ बंगळूरच नव्हे तर इतर राज्यांतील गुंतवणुकदारांनी पोलिसांत धाव घेतली आहे. आतापर्यंत सुमारे 13 हजारजणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. आयएमएचा मालक मन्सूर खानने कुटुंबीयांसह दुबईला पलायन केल्याचे समजते. तो सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असून मोबाईल, व्हॉटस्अ‍ॅप बंद आहे.

रविकांतेगौडा करणार नेतृत्व

या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आली आहे. या पथकाचे नेतृत्व बेळगावचे माजी जिल्हा पोलिसप्रमुख आणि अग्‍निशामक दलाचे विद्यमान उपमहानिरीक्षक रविकांतेगौडा करणार आहेत. एसआयटीमध्ये एकूण दहाजण आहेत. सीसीबीचे डीसीपी गिरीश, एसीपी बालराज, सीआयडीचे डीवायएसपी रवीशंकर, गुप्‍तचर डीवायएसपी राजा इमाम कासीम, निरीक्षक गीता, राजेश, शेखर, अंजन कुमार, तन्वीर अहमद यांच्यासह दहाजणांचा समावेश आहे. या पथकाला तत्काळ तपास सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. पण, तपासासाठी ठरावीक मुदत देण्यात आलेली नाही.

आयएमए घोटाळ्यात आपला कोणताही हात नाही. मंत्री जमीर अहमद यांच्यावर संशय नाही. याविरोधात एसआयटी नव्हे सीबीआय चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत आवाहन करणार आहे. -रोशन बेग आमदार

अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात येईल. दोन कार जप्‍त करण्यात आल्या आहेत. -राहुल कुमार डीसीपी, बंगळूर उत्तर