Sat, Dec 14, 2019 05:37होमपेज › Belgaon › येडियुराप्पांच्या माफीसाठी सभागृह ठप्प

येडियुराप्पांच्या माफीसाठी सभागृह ठप्प

Published On: Dec 21 2018 1:21AM | Last Updated: Dec 20 2018 10:47PM
बेळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विरोधी पक्षनेते येडियुराप्पा यांचा अपमान केला असून सभागृहात त्यांनी माफी मागावी. शेतकर्‍यांना सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीबाबत स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी भाजप आमदारांनी गुरुवारी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे दिवसभराचे कामकाज ठप्प करण्यात आले.

विधानसभेचे कामकाज गुरुवारी दोनवेळा तहकूब करण्यात आले. विरोधक दिवसभर आक्रमक असल्याने दुपारी दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याची घोषणा सभापती रमेशकुमार यांनी केली.  मुख्यमंत्री कुमारस्वामी व विरोधी पक्षनेते   बी. एस. येडियुराप्पा यांच्यामध्ये विधानसभेत बुधवारी सायंकाळी शाब्दिक चकमक झाली होती. कुमारस्वामी राज्याचा कारभार हॉटेलमधून चालवितात, असा आरोप येडियुराप्पा यांनी केला होता. यावर आक्षेप घेत कुमारस्वामी यांनी आपल्या खासगी खर्चातून तब्येत बरी नसल्याने हॉटेलमध्ये राहत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यामुळे बुधवारी सायंकाळपासून भाजपा आमदारांनी आंदोलन सुरू केले आहे.  भाजप सदस्यांनी सभापतींसमोर असणार्‍या हौदामध्ये उतरून जोरदार घोषणा सुरू केली. विरोधी पक्षनेते येडियुराप्पा म्हणाले, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे दुष्काळाबाबत चर्चा करण्याची व सरकारतर्फे आखलेल्या योजनाबाबत  खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना शेतकर्‍यांच्या अडचणींची जाणीव नाही. जगदीश शेट्टर म्हणाले, सरकारला शेतकर्‍यांच्या अडचणींचा विसर पडला आहे.  केवळ घोषणाबाजी करण्यात येत आहे.आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने सभागृह दिवसभरात दोनदा तहकूब केले. त्यानंतर सभापती रमेशकुमार यांनी दिवसभरासाठी काम थांबविल्याची घोषणा केली.