Mon, Dec 09, 2019 11:02होमपेज › Belgaon › हिंडलगा जेलरसह चौघे निलंबित

हिंडलगा जेलरसह चौघे निलंबित

Published On: Apr 27 2019 1:57AM | Last Updated: Apr 27 2019 1:57AM
बेळगाव : प्रतिनिधी

हिंडलगा कारागृहाची 20 फूट भिंत चढून कैदी फरारी झाल्यामुळे राज्य कारागृह प्रशासनाने जेलरसह चौघांना निलंबित केले आहे. फरारी मुरगनच्या तपासासाठी चार पथके केली असून, बंगळूरसह त्या भागात कैद्याचा शोध सुरू आहे. 

दि. 22 एप्रिल रोजी मुरगन ऊर्फ मुरगा हा कैदी फरारी झाला. त्याला मदत केल्याचा तसेच स्वतः देखील पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या सलीम अब्दुलखैम (वय 33), मुबारक ऊर्फ बतीस्टा महंमद दस्तगीर (29, इस्लामपूर) व करुणाकर पटाळी (45, सुळ्या) या तिघांवर वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

फरारी कैदी अद्यापही सापडलेला नाही, त्यामुळे हे प्रकरण राज्य कारागृह प्रशासनाने फारच गांभीर्याने घेतले. या प्रकरणी जेलर, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल अशा चार जणांना निलंबित केले आहे. कैदी फरारी झाला 

त्या दिवशी हे चौघेही ड्युटीवर होते. त्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे सांगण्यात येते. चार पथके फरारी कैदी मुरगन याच्या शोधासाठी कारागृह प्रशासन व पोलिस खात्याने चार पथके तयार केली आहे. बंगळूरजवळील कोळेगल परिसरासह गोवा, बेळगाव परिसरातही त्यांचा शोध सुरू आहे. फरारी कैद्याला लवकरच जेरबंद केले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

कारागृह अधीक्षकांना काळजी ‘त्या’ चौघांची 

इतकी कडक सुरक्षा व्यवस्था व 20 फुटाची तटबंदी चढून कैदी फरारी झाला आहे. यामुळे कारागृहातील कर्मचार्‍यांचा गलथानपणा समोर आला आहे. अधिकारी व कर्मचारी नेमके काय करतात? हा प्रश्‍न उपस्थित होते. ज्या चौघांना निलंबित केले त्यांची नावे सांगा, असे जेव्हा कारागृह अधीक्षक टी. पी. शेष यांना विचारले, तेव्हा त्यांनी त्यांची उगीच बदनामी नको म्हणून नावे सांगण्यास नकार दिला. ज्यांच्या चुकीमुळे फाशीचा कैदी फरारी झाला, त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज असताना अधीक्षक शेष मात्र त्यांना पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे.