Sat, Dec 14, 2019 05:39होमपेज › Belgaon › छुपा कॅमेरा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

छुपा कॅमेरा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

Published On: May 19 2019 1:33AM | Last Updated: May 18 2019 11:51PM
बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील एका नामांकित बीपीओ कंपनीमध्ये महिला स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लावण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर प्रकरणाची पोलिस खात्याकडून चौकशी करण्यात आली असली तरी प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. 

बीपीओ कंपनीतच उच्च पदावर असणार्‍या एका कर्मचार्‍यानेच सदर कॅमेरा बसविला होता, असे चौकशीतून पुढे आले होते. याबाबत कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांची पोलिसांकडून झडती घेण्यात आली होती. कंपनीत साफसफाई करणार्‍या महिलेकडून सदर प्रकरण उघडकीस आले होते. सदर माहिती कंपनीच्या विदेशात असणार्‍या मालकालाही कळविण्यात आली होती. या घटनेची कुणकुण पोलिस खात्याला लागली होती. यावरून या प्रकरणाची विशेष पथकाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. सदर पथकाने घटनास्थळी पाहणी केली होती. तसेच सर्व कर्मचार्‍यांची चौकशी करून या प्रकरणाचा उलगडा केला आहे. असे असले तरी या प्रकरणाची नोंद कोणत्याही पोलिस स्थानकात झालेली नाही.  

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विदेशात राहणार्‍या कंपनीच्या मालकालाही चौकशीसाठी पोलिस स्थानकाला हजेरी द्यावी लागली आहे. मात्र  पंधरा दिवसांपूर्वी सदर कंपनी बंद झाली आहे. विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार सदर घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून सखोल चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. असे असले तरी छुपा कॅमेरा बसविलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍याविरोधात कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही. तर भीतीपोटी कोणत्याही कर्मचार्‍याने तक्रार नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदर प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.