Mon, Jan 20, 2020 09:51होमपेज › Belgaon › चिकोडीत हायटेक जलतरण तलाव 

चिकोडीत हायटेक जलतरण तलाव 

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:09PMचिकोडी : काशिनाथ सुळकुडे 

चिकोडी शहरात सर्वसोयींनीयुक्त अत्याधुनिक जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले असून तालुक्याच्या ठिकाणी व नगरपालिकेच्या व्याप्तीत असणारा राज्यातील पहिलाच हायटेक जलतरण तलाव ठरणार आहे. यामुळे चिकोडीच्या सौंदर्यात व नावलौकिकात भर पडणार आहे. 

आमदार गणेश हुक्केरींच्या प्रयत्नातून मंजूर 1 कोटी 12 लाख रुपये विशेष अनुदानातून  हरीनगरात नगरपालिकेच्या 8 गुंठे जागेत या जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. अवघ्या 9 महिन्यात या अत्याधुनिक जलतरण तलावाचे काम जयसिंगपूरच्या नितीन कन्सट्रक्शनकडून पूर्ण करण्यात आले आहे. 

हा जलतरण तलाव सहा लाख लिटर पाणीसाठा क्षमता  व 15 ×25 मीटर आकाराचा आहे. दक्षिणेला 6 फूट व उत्तरेला 4 फूट इतकी तलावाची खोली आहे. या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र  चेंजिंग रुम व शॉवर बाथरुम्सची निर्मिती तसेच प्रखर दिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. शॉवरची निर्मिती करण्यात आली असून जलतरण तलावाच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.   या ठिकाणी वॉटर फिल्टरेशन सिस्टीमदेखील बसविण्यात आली असून याव्दारे दिवसातील आठ तास तलावातील पाणी खेचून शुध्दीकरण करून पुन्हा तलावात सोडण्यात येते. यामुळे तलावातील पाणी बदलण्याची गरज नसते. या ठिकाणी पालिकेकडून लाईफगार्ड व ट्रेनरची नेमणूक केली जाणार आहे. पुढील काळात सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या बॅचेस ठेवल्या जाणार आहेत. यामुळे पुढील काळात चिकोडीत जिल्हास्तरीय तसेच विविध जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यास मदत मिळणार आहे. 

ग्रामीण भागात पोहण्यात तरबेज असणारे अनेक तरुण व तरुणी आहेत. त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा असते. पण योग्य व्यासपीठ व प्रशिक्षण नसल्यामुळे संधीपासून वंचित होतात. अशा तरुण जलतरणपटूंना या अत्याधुनिक तलावामुळे राष्ट्रीय पातळीवर झळकण्यास मोलाची मदत मिळणार आहे. चिकोडीत उभारण्यात आलेला हा हायटेक जलतरण तलाव तालुक्याच्या ठिकाणी व नगरपलिकेच्या व्याप्तीत असणारा राज्यातील पहिलाच तलाव ठरणार आहे.