Thu, Dec 12, 2019 22:12होमपेज › Belgaon › संततधार पावसाने शेतकर्‍यांची हानी

संततधार पावसाने शेतकर्‍यांची हानी

Published On: Jul 12 2019 1:45AM | Last Updated: Jul 11 2019 10:12PM
बेळगाव : प्रतिनिधी

अगसगे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाचा शेतकर्‍यांना  फटका बसला आहे. शिवारात पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे.  नाल्यांचे बांध फुटून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे उगवण झालेली भात पिके वाहून गेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. 

अगसगे परिसरात चार  दिवसापासून सुरू असलेेल्या पावसाने उघडीप दिली नसल्याने शेती कामे खोळंबली आहेत. तर नाल्यांच्या पात्रात पाण्याची वाढ होऊन पाणी शिवारात शिरले आहे. त्यामुळे शिवारातील पिकांचे नुकसान झाले आहे. नाला, ओढ्यांचे बांध ठिकठिकाणी फुटून खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे माळरानावर पेरलेले भुईमूग पीक जमिनीतच कुजून जात आहे. पाण्यामुळे बटाटा पिकाचे  नुकसान झाले आहे. 

यावर्षी वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणी हंगाम उशीरा सुरू झाला. शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली होती. पावसाच्या प्रतिक्षेत असणार्‍या मोसमी पावसानेही बरेच दिवस ताटकळत ठेवले . मोसमी पावसाला विलंबाने सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने शेतकर्‍यांना शेती कामे करून घेण्यासाठी उसंत दिली नाही. यामुळे अनेक एकर शेतजमीन पेरणीविना पडून आहे. पावसाळी हंगामातील पिके घेणे याठिकाणी अशक्य झाले आहे. शेतवडीत पाणीच पाणी झाल्याने बटाटा लागवड, भुईमूग पेरणी, मका, सोयाबीन आदी पिके अडचणीत आली आहेत.  

अगसगे परिसरात पावसाळी हंगामात मोठ्याप्रमाणात बटाटा लागवड केली जाते. अनेक शेतकर्‍यांनी लागवडीसाठी बटाटा बियाणे आणून ठेवले आहेत. मात्र सततच्या पावसामुळे बटाटा लागवड खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना बियाणांचे काय करावे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर बटाटा लागवड केलेल्या शेतवडीतील पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने लागवड केलेली बियाणे कुजत आहेत. 

तर अनेक शेतकर्‍यांनी लागवडीसाठी बटाटा बियाणे कापून ठेवली आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. पावसाने असाच जोर कायम ठेवल्यास बटाटा लागवड करणे अशक्य आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. नाल्यांवर अतिक्रमण करून शेती  करण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी शेतवडीत शिरले आहे. यामुळे नाल्याच्या काठावरील शेतवडीचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाईची मागणी

पावसामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. लाखो रुपयाचा फटका बसला आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अडचणीत सापडलेल्या शेतकरीवर्गातून होत आहे.