Sat, Dec 14, 2019 05:50होमपेज › Belgaon › जमिनी परत करा; अन्यथा फाशी द्या

जमिनी परत करा; अन्यथा फाशी द्या

Published On: May 19 2019 1:33AM | Last Updated: May 19 2019 1:33AM
बेळगाव : प्रतिनिधी

हलगा - मच्छे बायपास रोड रद्द करा, या मागणीसाठी शनिवारी या परिसरातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबीयांसह बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हातातील दोर्‍या दाखवत त्यांनी आमच्या जमिनी परत द्या, अन्यथा आम्हाला फाशी द्या, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. उन्हाच्या तीव्रतेमध्ये लहान मुले, महिलांसह तीन तास शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला.

महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे, वन आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आंदोलकांची भेट घेऊन ज्यांची जमीन नोटीस न देता संपादित केली जात आहे, अशा शेतकर्‍यांसंदर्भात अधिकार्‍यांची तत्काळ बैठक घेऊन चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

हलगा - मच्छे बायपास रस्त्याचा प्रकल्प रद्द करा, ज्यांना नोटिसी देण्यात आलेल्या नाहीत, त्यांच्या बेकायदा जमिनी संपादित करू नका, पडीक जमिनीतून हा रस्ता करा किंवा यावर फ्लायओव्हर करा आदी मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वडगाव, हलगा, जुने बेळगाव, अनगोळ, मजगाव, मच्छे, शहापूर आदी परिसरातील शेतकरी कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी झाले होते. रयत शेतकरी संघटनेनेही मोर्चात सहभाग घेतला होता.  

भाजी भाकरी, हातात दोरी घेऊन मोर्चा काढण्यात आला होता. ‘आमच्या जमिनी परत द्या; अन्यथा आम्हाला येथेच फाशी द्या’, अशा घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला तेव्हा महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे, पालकमंत्री सतीश जारकिहोळी जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आढावा बैठक घेत होते. यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आंदोलनकर्ते सुमारे दोन तास भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले.  महसूलमंत्री देशपांडे, पालकमंत्री जारकिहोळी यांनी बाहेर येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. 

अल्पभूधारक शेतकर्‍याला देशोधाडीला लावू नका, तीन पिकांसह बासमती भातपीक देणारी शेती उद्ध्वस्त करु नका, नोटिसा न देता ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. त्या अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. 

आंदोलनामध्ये राजू मरवे, गंगाधर बिर्जे, रमांकात बाळेकुंद्री, प्रकाश नायक, नीलम बिर्जे, मालन काजोळकर, कमल तारिहाळकर, शेतकरी संघटनेचे नेते चुन्नाप्पा पुजारी,  जयश्री गुरण्णावर, अशोक यमकनमर्डी, जावेद मुल्ला  आदी सहभागी झाले होते.

दोन वेळा नोटिसा दिल्याचा दावा

नोटिसा न देता जमिनी संपादित केला जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. याबाबत  महसूलमंत्री देशपांडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विशाल आर. यांच्याकडे  विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दोनवेळा नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले. यावरुन वाद वाढल्याने देशपांडे यांनी बैठक घेऊन सत्यता पडताळण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

आणि त्यांनाही रडू कोसळले...

आपल्या हातात आता गुंठ्यामध्ये जमिनी शिल्लक आहे. तीही काढून घेतल्यास आम्ही उघड्यावर पडू, अशी गार्‍हाणी मंत्र्यांसमोर मांडताना काही महिलांना रडू कोसळले. काही जणांनी त्ंयांना आधार दिला. हे पाहातच त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या मुलांनाही रडू कोसळले. 

नोटीस न देता भू-संपादन बेकायदेशीर : पालकमंत्री

बेळगाव  (प्रतिनिधी) : नोटिसा न बजावता जमीन संपादन करणे बेकायदेशीर आहे. तसे केल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. हलगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. याबाबत अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले,  नोटिसा न देता जमीन संपादित करता येणार नाही. तसे झाले असल्यास ते बेकायदेशीर आहे. त्याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल.

हलगा - मच्छे बायपास का नको?
    बायपाससाठी घेण्यात आलेली जमीन ही वर्षाला तीन पिके देणारी आहे.
    जगात बासमती तांदळासाठी प्रसिद्ध असणारी एकमेव जमीन
    बायपाससाठी दुर्मीळ जातीचे झाडे तोडण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाला हानीकारक
    येथे संपूर्णपणे काळी माती असल्यामुळे रस्त्यासाठी अत्यंत अयोग्य
    शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर येणार.
    बायपासऐवजी फ्लायओव्हर करणे शक्य
    नजीकच्या पडीक जमिनीतूनही रस्ता काढणे योग्य होईल.