Sat, Dec 14, 2019 06:12होमपेज › Belgaon › ग्रा. पं. चा रंगणार फड, इच्छुकांची वाढली धडपड

ग्रा. पं. चा रंगणार फड, इच्छुकांची वाढली धडपड

Published On: Jul 17 2019 2:05AM | Last Updated: Jul 16 2019 8:32PM
बेळगाव : प्रतिनिधी

ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असणार्‍या ग्रा. पं. च्या निवडणुका वर्षभरात होणार आहे. याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने इच्छुकांची धडधड वाढली आहे. राजकारणात सक्रिय होऊ इच्छिणार्‍यांना राजकारणात वर्षभर सक्रिय राहावे लागणार आहे. तर विद्यमान सदस्यांना आपला गड राखण्यासाठी, मतदारांची मर्जी सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.ग्रामीण राजकारणात ग्रा. पं. च्या निवडणुका महत्त्वाच्या मानण्यात येतात. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण सत्ताकेंद्रे हातात ठेवण्यासाठी तालुका स्तरावरील नेत्यांनाही सक्रिय व्हावे लागणार आहे. परिणामी ग्रामीण भागात वर्षभर राजकारण तापलेले राहणार आहे.

सध्या कार्यरत असलेल्या ग्रा. पं. नी चार वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. यामुळे जूनपूर्वी जिल्हा प्रशासनाला निवडणुका घ्यावा लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदार कार्यालयांना बजावले आहेत. येत्या काळात प्रभाग रचना, मतदार नोंदणी कामाला वेग येणार आहे.

राजकारणात शिरकाव करू पाहणार्‍या नेत्यांसाठी ग्रा. पं. ची निवडणूक महत्त्वाची असते. ग्रा. पं. च्या माध्यमातून अनेकजण राजकारणात सक्रिय होतात. यामुळे ग्रा. पं. साठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये इच्छुक युवकांचा अधिक भरणा आहे.  ग्रा. पं. चा गड काबीज करण्यासाठी आतापासून डाव-प्रतिडावाचा खेळ रंगणार आहे. यासाठी मतदारांवर भुरळ घालण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या कार्यरत असणारे सदस्य सरकारी योजनांचा मारा मतदारांवर करणार आहेत. युवकांना प्रलोभन दाखविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 

ग्रामीण भागातील राजकारण वर्षभर ढवळून निघणार आहे. राजकारणातील धाकटी पाती राजकारणाच्या फडात कार्यरत होणार आहेत. आरोप-प्रत्यारोप रंगणार आहेत. योजनांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होणार आहे.  वर्षभरात मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विकासकामांचा धडाका लागण्याची शक्यता आहे. योजनांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. 

सणांवर राजकारणाचे सावट

वर्षभर सार्वजनिकरित्या साजर्‍या होणार्‍या सण, उत्सवावर सणांचे सावट राहणार आहे. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा सणाच्या वेळी युवक मंडळे, महिला मंडळे यांना आकर्षित करण्यासाठी देणग्यांचा ओघ इच्छुकांकडून वाढणार आहे. यामुळे युवक मंडळांची चंगळ राहणार आहे. ग्रा. पं. चा सतासोपान चढण्यासाठी इच्छुक सदस्य मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहेत.