बंगळूर : प्रतिनिधी
भाजप नेत्यांकडून वारंवार काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळणार असल्याचे विधान करण्यात येत असल्याने आघाडीतील दोन्ही पक्षांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भोजन समारंभाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांची संयुक्त विधिमंडळ बैठक होणार आहे.
भाजपकडून काँग्रेसमधील नाराज आमदारांना गळ टाकण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीतील दोन्ही पक्ष आपापल्या नाराज आमदारांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत. या बैठकीची अधिकृत माहिती दिलेली नाही; पण त्या दिवशी भोजन समारंभ होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना कळविले आहे. काही दिवसांपूर्वी नोटीस जारी केलेले काँग्रेस आमदार यावेळी उपस्थित राहणार की नाही, याविषयी स्पष्ट झालेले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे व्हीप जारी करण्याचा निर्णय सिद्धरामय्यांनी घेतला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री सदानंदगौडा यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांकडून त्या पक्षाला धोका असल्याचे विधान केले आहे. मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडतील की नाही, याबाबत शंका आहे. लक्ष्मण सवदी यांनी आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद त्यांच्यासाठी घातक ठरणार असल्याचे भाकीत केले आहे. विधान परिषद सदस्य एन. रवीकुमार यांनी सिद्धरामय्यांना महागड्या भेटवस्तू देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय, निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याकडे राजकारणात प्रवेश करताना साडेतीन एकर जमीन होती. आज त्यांच्याकडे 3 हजार एकर जमीन असल्याचा आरोपही त्यांनी केला.
२०० कोटी रुपयांची ऑफर
आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून काँग्रेसमधील आमदार फोडण्याचा प्रयत्न होत आहे. आमदारांना 200 ते 300 कोटी रुपयांचे आमिष दाखविण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.