Sun, Dec 15, 2019 03:56होमपेज › Belgaon › मुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या

मुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 10:00PMदहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना ट्यूशनला पाठविले म्हणजे आपले कर्तव्य झाले, असे समजू नये. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. मासिक परीक्षा, अर्ध वार्षिक परीक्षा, फायनल परीक्षेआधी होणार्‍या परीक्षा या सर्व परीक्षांचे पेपर घरी पहा, मुले या परीक्षांमध्ये नापास जरी झाली असली तरी त्यांना समजून घ्या. प्रगतीपुस्तक घरात दाखविण्यास त्यांना भीती वाटणार नाही, असे वातावरण घरात ठेवा. उलट अपयशातून यशाचा मार्ग कसा काढायचा, यावर चर्चा करा. 

संपूर्ण शैक्षणिक वर्षात किमान दोन तीनवेळा मुख्याध्यापक, विविध विषयांचे शिक्षक यांना भेटा त्यांचेबरोबर नम्रतेने बोलून तुमच्या मुलांच्या अडचणी त्यांना सांगा. शिक्षकांचे प्रश्‍न समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वत:च्या मुलांचा आहारविहार आणि  आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आपली मुले ट्यूशन,  एक्स्ट्रा क्‍लास या नावाखाली योग्य ठिकाणी जात आहेत का, याची खात्री करत राहा. टी.व्ही. पाहण्यावर घरच्या लोकांनीच बंधने घालनू घ्यावीत. परीक्षा जवळ आलेली असताना दीर्घ काळासाठी मुलांची शाळा चुकेल असे सण समारंभ यात्रा जत्रा शक्यतो टाळा. 

स्मरणशक्ती वाढण्याच्या औषधांचा सुळसुळाट ऐन परीक्षेच्या मोसमात सुरु होतो. त्यावर किती विश्‍वास ठेवायचा. आठवीपासून दहावी पर्यंत आपल्या मुलाची बुद्धी, शक्ती त्याची कुवत आपल्या ध्यानी झालेली असते. मग ‘पी हळद आणि हो गोरी असे होईल का’? या विचार करायच्या गोष्टी आहेत. 
परीक्षा जवळ आली की पेपर फुटीचे प्रकार घडतात. इतके पैसे द्या आणि प्रश्‍नपत्रिका घ्या अशी ऑफर देणारे महाभाग भेटतात. अशा प्रकारच्या काळ्या बाजारात खरेदीला उभे रहायचे का?  परीक्षा झाल्यानंतरही फर्स्टक्‍लास पाहिजे का डिस्ट्रिंक्शन? कितीपैसे देता? असे म्हणणारे भेटतात. त्यांच्या किती मागे लागायचे, विश्‍वास ठेवायचा की तुम्हीच ठरवा.

आपल्या मुलाची कुवत कळल्यावरही वर्गातल्या स्कॉलर मुलांशी, नात्यातल्या हुशार मुलांशी तुलना करून आपणच आपल्या मुलांना टॉर्चर नाही का करत? मुलांचे अतिलाड करू नका, फर्स्टक्‍लास आला तर स्मार्ट फोन, डिस्ट्रींक्शन मिळेल तर कॉलेजला जायला बाईक, असे प्रलोभनाचे यश म्हणजे मुलांना प्रलोभनांच्या गर्तेत लोटण्यासारखे आहे. घरात  वातावरण हसते खेळते ठेवण्याचा प्रयत्न करा.                  

-माधव कुंटे,  निवृत्त शिक्षक