नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातून निधर्मी जनता दलाने (निजद) 10 जागांवर दावा केला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान आणि ‘निजद’चे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांची बुधवारी सकाळी भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा केली.
राहुल गांधी यांच्याशी जागा वाटपाबाबत बैठक झाली असल्याचे देवेगौडा यांनी सांगून कर्नाटकातील 28 जागांपैकी 18 काँग्रेसला तर 10 जागा निजदला, असा प्रस्ताव मांडला असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिला नाही. राहुल गांधी हे पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि दानिश अली यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतील, असे सूत्रांकडून समजते. आठवड्यापूर्वीही जागा वाटपावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी निजदने 12 जागा मागितल्या होत्या. त्यानंतर देवेगौडा यांनी दोन जागा कमी करून 10 जागांवर दावा केला आहे.