Sat, Dec 14, 2019 06:13होमपेज › Belgaon › विषाची बाटली द्या, मग जमिनी घ्या

विषाची बाटली द्या, मग जमिनी घ्या

Published On: Jan 06 2019 2:17AM | Last Updated: Jan 06 2019 12:36AM
बेळगाव : प्रतिनिधी 

महापालिकेच्यावतीने हलगा (ता. बेळगाव) येथे उभारण्यात येणार्‍या सांडपाणी प्रकल्पासाठी आम्हाला विषाची बाटली द्या, मग आमच्या जमिनी संपादित करा, असा इशारा शेतकर्‍यांनी दिल्याने बैठक आटोपण्यात आली. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हलगा येथील सांडपाणी प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या नियोजनाची बैठक बोलाविण्यात आली होती. शेतकर्‍यांचा रोष पाहून ही बैठक थांबवण्यात आली. शेवटी याबाबत अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकर्‍यांची समिती नेमून याबाबत विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी वनमंत्री सतीश जारकीहोळी होते. 

बैठकीला खा. प्रकाश हुक्केरी, म्हैसूर मिनरल वॉटर महामंडळाच्या अध्यक्षा आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, महापौर बसप्पा चिक्‍कलदिनी, उपमहापौर मधुुश्री पुजारी, जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी, पोलिस आयुक्‍त डी. सी. राजप्पा आदी उपस्थित होते. 

सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा येथील 19 एकर  20 गुंठे जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये 21 शेतकरी कुटुंबियांची जमीन जाणार आहे. ज्या शेतकर्‍यांना नोटिसा आल्या होत्या त्यांनी शेतकर्‍यांनी जमीन संपादनावर जोरदार हरकत घेतली. यापूर्वी सुवर्णसौधसाठी आमच्या जमिनी काढून घेण्यात आल्या आहेत. आता काही गुंठ्यामध्ये जमीन उरली असताना याही काढून घेण्यात येत आहेत. ही जमीन सुपीक आणि वर्षाला तीन पिके देणारी आहे. तुम्ही जमीन काढूनच घेणार असाल तर आम्हाला विष द्या मग जमीन घ्या. कोणत्याही परस्थितीत आम्ही जमिनी देणार नाही, असा आक्षेप घेतल्यानंतर मंत्री जारकीहोळी यांनी सांडपाणी प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधी,  शेतकर्‍यांचे नेते, अधिकारी यांची संयुक्‍त समिती नेमून या प्रकल्पाबात फेरविचार करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर ही बैठक स्थगित करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्‍त शशिधर कुरेर, प्रांत कविता योगपण्णावर, तहसीलदार मंजुळा नाईक, शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत, इतर शेतकरी आदी उपस्थित होते. 

सांडपाणी, कचरा ग्रामीणमध्ये का?

बेळगावमध्ये गोळा होणार कचरा, सांडपाणी ग्रामीण भागातच का सोडता, असा सवाल आ. हेब्बाळकर यांनी महापालिका प्रशासनाला विचारला. कचर्‍याची विल्हेवाट शहरातच प्रकल्प उभारुन लावण्यात यावी. सांडपाणी पॅकल्प पूर्वी निश्‍चित करण्यात आलेल्या अलारवाड येथेच का करण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी केला. यावेळी शेतकर्‍यांनीही आयुक्‍त शशिधर कुरेर यांना धारेवर धरले. शेतकरी संघटनेचे नेते सिदगोंड मोदगी, साजीद सनदी आदींना बैठकीपासून वंचित ठेवल्यानेही शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्‍त केली.