Mon, Sep 16, 2019 06:25होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या प्रकरण : उद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले

गौरी लंकेश हत्या प्रकरण : उद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले

Published On: Sep 21 2018 1:09AM | Last Updated: Sep 20 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश व डॉ. एम. एम. कुलबुर्गी यांच्या हत्यांसाठी बेळगावातील उद्यमबागमध्ये पाच पिस्तुली बनवण्यात आल्या होत्या, अशी खळबळजनक माहिती सीआयडी अधिकार्‍यांकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विचारवंतांच्या हत्याकांडासाठी बेळगावात प्रशिक्षणाबरोबरच शस्त्रेही बनवण्यात आल्याने बेळगावातील कारवाया अधिक गंभीर असल्याचे पुढे येत आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील एक संशयित शरद कळसकर याने उद्यमबागमध्ये लेथ मशीन घालून 2015 ते 2017 या काळात या पिस्तुली तयार केल्या आणि त्यांची चाचणी भर कुरणेच्या रिसॉर्टमध्ये झाली, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. पाचही पिस्तुली महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने  (एटीएस) काही दिवसांपूर्वी नालासोपारातून जप्त केल्या आहेत. 

तथापि, प्रत्यक्ष हत्याकांडावेळी या दुसर्‍याच 7.65 मिमी पिस्तुलीचा वापर केला गेला, असे तपास पथकाचे म्हणणे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शरदने उद्यमाबागमध्ये पाच पिस्तुली बनवून त्यांची चाचणी भरत कुरणेच्या रिसॉर्टमध्ये घेतली. पण त्यातून अचूक नेम साधला जात नव्हता. त्या अधिक  डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही विचारवंतांच्या हत्येसाठी 7.65 मिमी पिस्तुली वापरण्यात आल्याचे तपास संस्थांचे म्हणणे आहे. त्यातही डॉ. कलबुर्गी आणि गौरी यांच्या हत्येसाठी हीच पिस्तूल वापरली गेल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सिद्धही झाले आहे. त्यामुळे चारही हत्यांशी संबंधित असलेले संशयित एकाच गटातील असावेत, हा तपास संस्थांचा अंदाज खरा ठरला आहे. त्यामुळेच डॉ. दाभोळकर हत्येतील संशयित शरदला ताब्यात घेण्याचा प्रयत्न कर्नाटकाचे विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे. 

एटीएस अधिकार्‍यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून शरदने उद्यमबागेत पिस्तुली तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद 2015 ते 2017 या कालावधीत बेळगाव येथे वास्तव्यास होता. या दरम्यानच गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्याहत्या करण्यात आली आहे. त्याच्या राहण्याची सोय सध्या एसआयटीच्या ताब्यात असणार्‍या भरत 
कुरणे याने केली होती, असेही सूत्रांनी सांगितले.

बेळगाव हे विचारवंताच्या मारेकर्‍यांचे आश्रय स्थान ठरले असल्याचे मत सीआयडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्‍त केले आहे. गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापर करण्यात आलेल्या मोटर सायकलींच्या वापरामध्येही साम्य आढळल्याचे तपास अधिकार्‍यांनी म्हटले आहे. दुचाकी चौरी पटाईत असणार्‍या वासुदेव सूर्यवंशी ऊर्फ मेकॅनिक याने दोन्ही हत्यांसाठी दुचाकी पुरविल्याचे तपासातून पुढे आले आहे. 

एसआयटीने ताब्यात घेतलेल्या अमोल काळे व गौरी लंकेश हत्ये प्रकरणा हा चौकशीसाठी अटक करण्यात आलेल्या अमित देवगेकर आणि राजेश बंगेरा यांंचाही कलबुर्गी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे सीआयडीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

बेळगावचा वाढता सहभाग

हत्याकांडांसाठी शस्त्रप्रशिक्षण बेळगावजवळच्या चिखले गावात.
गौरी लंकेश हत्याकांडात बेळगावच्या भरत कुरणेला अटक
संशयितांचे बेळगावात कपिलेश्वर परिसरात 20 दिवस वास्तव्य.
हत्यांसाठी वापण्यासाठी पिस्तुलीही बेळगावातच बनवल्याचा दावा.