Thu, Dec 12, 2019 22:25होमपेज › Belgaon › गँगवाडीत गँगवॉर; 4 जखमी

गँगवाडीत गँगवॉर; 4 जखमी

Published On: May 11 2019 2:03AM | Last Updated: May 11 2019 12:13AM
बेळगाव ः प्रतिनिधी

गँगवाडी येथे सातत्याने दोन गटात होणारा वाद गुरुवारी रात्री पुन्हा उफाळून आला. अकराच्या सुमारास एका युवकावर तब्बल 15 जणांनी तलवार व दगडांनी हल्ला केला. सोडवायला गेलेली महिला आणि आणखी एकटा अशा दोघांवरही  हल्ला करण्यात आला. त्यात एकूण तिघेजण जखमी झाले. तर त्यानंतर हल्लेखोर गटातील युवकावर दुसर्‍या गटाने पहाटे हल्ला केला. त्यात तो जखमी झाला आहे. या हल्ल्याबद्दल 8 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. एकूण या टोळीयुद्धात चौघेजण जखमी असून, 23 जणांवर फिर्याद नोंद आहे. 

चार वर्षांपूर्वीच्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे माळमारुती पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणी अजय संजय लोंढे (30,  गँगवाडी) याने दिलेल्या फिर्यादीवरून हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खुळखुळा दादू चौगुले, विदुर खन्ना चौगुले, राहुल खन्ना चौगुले, महादेव ऊर्फ किरण चौगुले, शिवा राम देडे, डॉन मेताजी चौगुले, दवासकर मेताजी चौगुले, सुनील मेताजी चौगुले, लक्ष्मण गोपाल देडे, गणेश लक्ष्मण देडे, विनायक रंदवा सकट, गणपत रामा देडे, आदि डॉन चौगुले, प्रेम डॉन चौगुले, रूपेश खन्ना चौगुले (सर्वजण रा. गँगवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. 

गँगवाडीत लोंढे व चौगुले या दोन गटांमध्ये सातत्याने वाद होतो. 2015 मध्ये भांडण झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी अजय हा मेसकडे निघालेला असताना उपरोक्त संशियतांनी त्याला गाठले.  त्याच्याशी भांडण उकरून काढत तुझे फार झाले, आज याला सोडायचा नाही, असे म्हणत टोळीने त्याच्यावर तलवारीने हल्ला चढवला. तलवारीसह दगड व हातानेही त्याला मारहाण केली. त्याला सोडविण्यासाठी प्रीतम जयपाल लोंढे (35) व बिनाबाई मजीद चौगुले (55) हे गेले. या टोळक्याने त्यांच्यावरही हल्ला केला. तिघांना डोक्यावर, कपाळावर व शरीराच्या अन्य भागांवर गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात खुनी हल्ल्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला. या टोळक्याने नंतर गल्लीत थांबविलेली वाहने व घराच्या खिडक्यांवरही दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

घटनेची माहिती मिळताच मार्केटचे एसीपी नारायण बरमणी, माळमारुतीचे निरीक्षक जगदीश हंचनाळ यांच्यासह पोलिस कुमक गेली होती. या प्रकरणातील किरण नामक तरुणाला ताब्यात घेतले असून, उर्वरितांचा शोध सुरू आहे. एकावर प्रतिहल्ला अजय लोंढे याच्यावर हल्ला करून गँगवाडीतून 15 जणांनी पलायन केले. यापैकी विदूर खन्ना चौगुले (30, गँगवाडी) हा पळून जाऊन  अशोकनगरमध्ये लपला होता. पहाटे चारच्या सुमारास तो उठून वैभवनगर येथून गँगवाडीकडे निघाला होता. याची माहिती दुसर्‍या गटाला मिळाली त्यांनी त्याला रस्त्यात गाठून  बेदम मारहाण केली. यामध्ये विदूर हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावरही जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.