Mon, Dec 09, 2019 10:59होमपेज › Belgaon › ग्रा. पं. कार्यक्षेत्रात 500 रोपांची लागवड करा : एस. बी. मुळळ्ळी 

ग्रा. पं. कार्यक्षेत्रात 500 रोपांची लागवड करा : एस. बी. मुळळ्ळी 

Published On: Jun 15 2019 1:44AM | Last Updated: Jun 14 2019 9:05PM
बेळगाव : प्रतिनिधी

ग्रामीण भाग हा स्वयंपूर्ण बनणे आवश्यक आहे. यासाठी ग्राम पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) आणि ग्रा. पं. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. स्थानिक पातळीवर उपलब्ध असणार्‍या  साधनसामग्रीचा वापर करून विकास साधावा. ‘स्वच्छमेव जयते’च्या माध्यमातून प्रत्येक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात किमान 500 रोपांची लागवड करावी, असे मत जि. पं. साहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. मुळळ्ळी यांनी व्यक्‍त केले.

बेळगाव आणि खानापूर तालुका स्वच्छमेव जयते योजनेचा प्रारंभ शुक्रवारी बेळगाव ता. पं. कार्यालयात करण्यात आला. यावेळी मुळळ्ळी मार्गदर्शन करत होते. त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री कृष्ण बैरेगौडा यांनी ग्रा. पं. अध्यक्ष व पीडीओ यांच्याशी ‘सेटकॉम’च्या माध्यमातून संवाद साधला. मुळळ्ळी म्हणाले, बेळगाव आणि खानापूर तालुक्यात स्वच्छमेव जयते योजना यशस्वी करण्यासाठी अधिकार्‍यांनी कंबर कसावी. प्रशासनातर्फे  येते वर्ष जलामृत वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. यासाठी जलसंवर्धन, वृक्षारोपण कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येणार आहे.पीडीओ, अध्यक्षांशी संवाद साधताना मंत्री बैरेगौडा म्हणाले, राज्याला यावर्षी दुष्काळाने अडचणीत आणले आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जलामृत वर्ष  साजर  करण्यात  येणार आहेत. वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. राज्यभरात कोट्यवधी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रा. पं. ची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. प्रत्येक ग्रा.पं. कार्यक्षेत्रात किमान 500 रोपांची लागवड करावी.

जलसंवर्धनासाठी नालाखोदाई, तलावातील गाळ काढणे, चरी काढणे आदी कामे हाती घ्यावीत. यासाठी रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध केला जाणार आहे. यातून भूजल पातळीत वाढ होईल. गावातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करावी. यासाठी स्थानिक पातळीवर कार्यरत असणार्‍या महिला स्वसाहाय्य संघांना प्राधान्य द्यावे. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत. ता. पं. कार्यकारी पद्मजा पाटील, सहाय्यक कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन बगादी उपस्थित होते.

मराठी भाषिकांची अडचण 

कार्यक्रमासाठी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ग्रा. पं. अध्यक्षांची उपस्थिती होती. मात्र ग्रामविकास मंत्री कृष्ण बैरेगौडा यांनी ‘सेटकॉम’च्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन केवळ कन्नडमधून होते. यामुळे कार्यक्रमासाठी खानापूर आणि बेळगाव तालुक्यातील ग्रा. पं. अध्यक्षांची अडचण झाली. यामुळे दुपारनंतर बैठकीतून मराठी भाषिक लोकप्रतिनिधींनी उठून जाणे पसंत केले. स्थानिक अधिकार्‍यांनी मराठीतून मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.