Tue, Dec 10, 2019 13:45होमपेज › Belgaon › सासूच्या कर्जाची फेड सुनेच्या बँक खात्यातून

सासूच्या कर्जाची फेड सुनेच्या बँक खात्यातून

Published On: Jun 09 2019 1:23AM | Last Updated: Jun 08 2019 11:33PM
बेळगाव : प्रतिनिधी

सून रोजगार हमी योजनेच्या कामावर जाते आणि तिचा पगार थेट बँकेत जमा होतो. परंतु, बँक व्यवस्थापकाने हा पगार सासूने घेतलेल्या कर्जापोटी फेडून घेण्याचा तगादा सुनेला लावला आहे. राबणारी मी आणि माझा पगार सासूच्या कर्जासाठी का घेता? असे म्हणत याला विरोध केला आहे. तरीही व्यवस्थापक ऐकत नाही म्हटल्यानंतर सुनेने रागाने त्या बँकेतील आपले खातेच बंद करून टाकले. 
दुष्काळात होरपळणार्‍या जनतेसाठी रोजगार हमी योजनेतील कामे जगण्याचा आधार ठरली आहेत. दैनंदिन आर्थिक गरजा भागाव्यात, तसेच चार पैसे कनवटीला राहावेत, यासाठी पुरूषांसह अनेक महिला देखील केंद्र शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर जातात. 

ग्रामपचयतींकडून नेमून दिलेल्या व रोजगार हमी योजनेच्या नियमात बसणारी कामे या योजनेच्या माध्यमातून केली जात आहेत. या योजनेतील कामगारांना जॉबकार्डही देण्यात आले आहे. शिवाय त्यांनी केलेल्या कामाचे पैसे थेट संबंधित कामगाराच्या बँक खात्यावर जमा केले जात आहेत. कडोली परिसरातील अशीच एक सूनही रोहयोच्या कामावर जाते. यातून तिच्या बँक खात्यावर चार पैसे जमा होत आहेत. परंतु, हे बघवत नसलेल्या बँक व्यवस्थापकाडून गैरफायदा घेतला जात आहे. ज्या बँकेत सुनेचा पगार जमा होतो, नेमक्या त्याच बँकेतून या महिलेच्या सासूने पूर्वी कर्ज घेतलेले आहे. जेव्हा सून आपल्या खात्यावरील रक्कम काढण्यासाठी गेली तेव्हा बँक व्यवस्थापकाने तुमच्या सासूचे येथे कर्ज आहे. त्यामुळे तुमच्या रोजगाराची रक्कम कर्जापोटी जमा करावी लागेल, असे सांगितले.

हे ऐकताच सून जाम भडकली. सासूच्या कर्जाशी आपला काय संबंध? हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत ते मला मिळालेच पाहिजेत, असे तिने ठणकावून सांगितले. तरीही व्यवस्थापकही कर्जापोटी जमा करून घेण्याच्या हट्टावरच अडले. तरीही सुनेने आपला हट्ट सोडला नाही. माझे पैसे मलाच मिळायला पाहिजेत, असे म्हणत तिने बँक व्यवस्थापकाचा पिच्छा पुरवला. दोन दिवस येरझार्‍या मारल्यानंतर अखेर तिला रक्कम मिळाली खरी परंतु, आपल्याच पैशासाठी बँकेने आपल्याला कोंडीत पकडल्याचे पाहून सून जाम भडकली. त्यामुळे तिने या बँकेतील आपले खातेच बंद करून टाकले.

दुष्काळात रोजगार मिळावा म्हणून महिला कामावर जातात. परंतु, बँक व्यवस्थापकाने थेट या महिलेची मजुरीच अन्यत्र जिरवण्याचा प्रयत्न केल्यानंतर सून भडकली तर यात नवल काहीच नाही.