Sat, Jan 18, 2020 23:18होमपेज › Belgaon › तिथे दंगा झालाय, मग आपणही करू

तिथे दंगा झालाय, मग आपणही करू

Published On: Dec 05 2018 1:12AM | Last Updated: Dec 04 2018 11:00PMबेळगाव: प्रतिनिधी

रविवारी मध्यरात्री रामलिंग खिंड गल्लीतून चौघे तरुण निघाले होते.  त्यापैकी दोघे मद्यप्राशन केले होते. गणाचारी गल्लीकडून येणार्‍या काहींनी लवकर घरी जा, खंजर गल्लीत दंगा झालाय, असे उगीचच सांगितले. खंजर गल्लीत काहीच झालेले नव्हते परंतु, ते लवकर घरी जावेत, हा सांगण्यामागील हेतू होता. परंतु, त्याचा वेगळाच अर्थ काढत चौघांनी तिथे दंगा झालाय का? मग आपणही येथेही दंगा करू, असे म्हणत काहीही कारण नसताना या चौघांनी दोन मोटारी व एका रिक्षावर भलेमोठे दगड घातले. 

शहरातील मध्यवर्ती भागातील रामलिंगखिंड गल्ली, शेरीगल्ली, मुजावर गल्ली परिसरात थांबलेल्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा तत्काळ तपास लावून याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये रामचंद्र उर्फ पिल्ल्या प्रमोद मुचंडी (वय 19, रा.शिवाजी रोड), अभिजित गजानन नावगेकर (वय 26, रा. शिवाजी रोड), कृष्णा उर्फ किशन नारायण सांगडे (वय 26, रा.कंग्राळगल्ली), विश्‍वनाथ उर्फ स्वप्नील चंद्रकांत देसूरकर (वय 22, रा. गोंधळी गल्ली), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 

रविवारी मध्यरात्री रामखिंड गल्ली, मुजावर गल्ली, शेरी गल्ली परिसरात घरासमोर लावण्यात आलेल्या दोन कार व एका रिक्षावर दगड फेक करून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती.  कारण, आधीच शहरातील तणाव आणि येथे फोडलेल्या गाड्या यामुळे खडेबाजारचे निरीक्षक धीरज शिंदे यांनी हा बाब गांभीर्याने घेतली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांचा त्यांनी शोध सुरू ठेवला व अवघ्या 24 तासांत संशयितांना अटक केली. 

कारण काय तर विनाकारण

या चौघांना पोलिसांनी जेव्हा गाडीवर दगड का मारले? असा प्रश्‍न केला तेव्हा एकाकडेही याचे काहीच ठोस उत्तर नव्हते. हे तरुण कुठेतरी पाच-सहा हजाराची नोकरी करणारे आहेत. त्यांचे वय देखील पंचवीशीचे आहे. रात्री पिऊन रस्त्यावरून दंगामस्ती करत निघाले होते. गणाचारी गल्लीतील काही तरुणांनी रस्त्यावर का दंगा करताय, घरी जा. असे सांगितले. परंतु, त्यांनाही त्यांनी उद्धटच उत्तर दिले. यावेळी सांगणार्‍यांनी त्यांना खंजर गल्लीत दंगा झालाय, पोलिस गाडी येईल, लवकर घरी जा, असे उगीचच सांगितले. तिथे दंगा झालाय ना, मग आपण येथे दंगा करू म्हणत रस्त्यावर थांबलेल्या कारवर बाजूला पडलेले मोठे दगड उचलून घातले. हे दगड इतके मोठे होते की काच फुटून ते कारमध्ये पडले. एक नव्हे तर दोन कार व एक रिक्षा विनाकारण फोडली. पण, तुम्ही का फोडला? याबाबतचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते.