Sat, Jun 06, 2020 12:15होमपेज › Belgaon › पीकविम्याअभावी शेतकर्‍यांना फटका 

पीकविम्याअभावी शेतकर्‍यांना फटका 

Last Updated: Nov 08 2019 8:44PM

बेकिनकेरे : सततच्या पावसामुळे पंधरवड्यापासून केवळ गवत वाळवण्याच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी. बेळगाव : प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्यातून बळीराजा सावरावा, या हेतूने सरकारने प्रमुख पिकांसाठी पीक विमा उतरवण्याची व्यवस्था  केली आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्याकडे शेतकरी फारसा उत्साह दाखवत नसल्याने सातत्याने येणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. 

बेळगाव तालुक्यात प्रामुख्याने भात पीक घेण्यात येते.   परतीच्या पावसाच्या तडाख्यात भात पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने काही वर्षांपासून पीकविमा योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेबाबत शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. यंदा परतीच्या पावसाने हातातोंडाला आलेल्या भात, सोयाबिन, बटाटे पीक कुजून गेले आहे.

 सद्यस्थितीत भात शिवारात मळण्या आटोपून रब्बी हंगाममातील पेरण्याही पूर्ण होत असत. मात्र गत काही वर्षात हे चित्र बदलत आहे. यंदा तर ध्यानीमनी नसलेल्या परतीच्या पावसाने अद्याप विश्रांती घेतली नाही. यामुळे बळीराजाचे अर्थकारण बिघडणार आहे. यासाठी प्रशासनाने पीकविमा काढण्यासाठी सुलभ पद्धत अनुकसरण्याची आवश्यकता आहे. 
विम्याबाबत हवी जागृती 

नैसर्गिक आपत्तीचा धोका दरवर्षी येत असल्याने कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गाववार मेळावे घेऊन पीकविम्याबाबत माहिती देऊन शेतकर्‍यांची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. 

दोन वर्षापूर्वी पीकविमा घेतला होता. मात्र एकूण पीक नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे. त्यामुळे आम्ही या विम्याला यंदा प्रतिसाद दिला नाही.  
- वसंत कणबरकर, 
शेतकरी, अतिवाड