Thu, Dec 12, 2019 22:21होमपेज › Belgaon › इंगळीला शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

इंगळीला शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

Published On: Jul 04 2019 3:20PM | Last Updated: Jul 04 2019 3:20PM
अंकली : वार्ताहर

इंगळी (ता. चिकोडी) येथील शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महादेव शिवाप्पा आंबी (वय ५५) असे मृताचे नाव आहे. शेती व्यवसायासाठी गावातील सहकारी संस्था व इतर आर्थिक संस्थेतून घेतलेले पंचवीस लाख रुपये कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून  त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अंकली पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.   

 याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की आत्महत्याग्रस्त शेतकरी महादेव शिवाप्पा आंबी यांनी यावर्षी शेती व्यवसायासाठी गावातील सहकारी संस्था व  इतर आर्थिक संस्थांमधून कर्ज घेतले होते. परंतु पीक व्यवस्थित न आल्याने ते कसे फेडायचे या चिंतेत होते. गेल्या तीन महिन्यांपासून कृष्णा नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने पाण्याविना शेतातील पीक करपून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.  यावर्षीही कर्ज फेडणे शक्य नसल्याने ते चिंतेत होते. यातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.  या घटनेविषयी फौजदार गणपती कोगनोळे  अधिक तपास करत आहेत