Mon, Dec 09, 2019 10:59होमपेज › Belgaon › कौटुंबिक वारसा वनसंरक्षणाचा..!

कौटुंबिक वारसा वनसंरक्षणाचा..!

Published On: May 15 2019 1:50AM | Last Updated: May 15 2019 12:22AM
खानापूर : वासुदेव चौगुले

वनसंवर्धन आणि संरक्षणाच्या कार्याला वाहून घेऊन गेल्या तीन दशकांपासून वसुंधरेच्या सेवेत रममाण झालेल्या वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी यांच्या घरातील सलग तिसरी पिढी निसर्ग रक्षणात सक्रिय झाली आहे. 

गेल्या चाळीस वर्षांपासून या कुटुंबाने निसर्ग आमुचे घर असे म्हणत वनसंपदा आणि वन्यजीवांच्या सेवेलाच जीवनाचे ध्येय मानले आहे. आज जागतिक कुटुंब दिनानिमित्त जंगलवेड्या कुटुंबाचे ध्येय जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या ध्येयामागची प्रेरणा काय, हे स्पष्ट झाले. संभाजीराव ऊर्फ एस. एस. निंगाणी यांचे वडील सिद्राय  वनखात्यात वॉचमन म्हणून सेवा बजावत असताना चंदन तस्करांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यावेळी संभाजी यांचे वय 17 वर्षे होते. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने खचून न जाता आपणही वनसंपदेचीच सेवा करायची, असे ठरवून वयाच्या अठराव्या वर्षापासून एस. एस. निंगाणी यांनी वनविभागातील सेवेचा श्रीगणेशा केला. आज त्यांच्या सेवेने साडेतीन दशके ओलांडली आहेत. ते लोंढाविभागाच्या आरएफओपदाची धुरा सांभाळत आहेत.

निंगाणी यांच्या मुलांना लहानपणापासूनच जंगलातील वास्तव्याचा अनुभव मिळाला. परिणामी जंगलाबद्दल त्यांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान आहे. त्यांचा मोठा मुलगा शिवानंद त्यामुळेच आरएफओ बनला असून, सध्या तो नागरहोळे अभयारण्यात सेवारत आहे. 

वनसंपदेच्या रक्षणात त्यांची तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. वनसंपत्तीचे रक्षण ही आपलीही जबाबदारी आहे, या जाणिवेचा स्थानिकांमध्ये अभाव होता. तो निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन्ही अधिकार्‍यांचा आहे. 

पूर्वी वनरक्षकांना पुरेशा सुविधा नव्हत्या. त्यासाठी जेथे त्यांची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली त्याठिकाणी स्टाफ वसतीगृहांची सुधारणा, जंगलात सेवा बजाविण्यासाठी जाताना लागणारी आवश्यक सुरक्षायंत्रणा पुरविण्यावर भर दिला. अधिकारी आणि कर्मचारी हे नाते न ठेवता कौटुंबिक जिव्हाळा निर्माण केल्याने साडेतीन दशकांचा प्रदीर्घ पल्ला पार करता आला. असे प्रांजळ मत ते व्यक्त करतात.