Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › मंत्रिमंडळ विस्तार; मुहूर्त ठरला, १२ जूनला 

मंत्रिमंडळ विस्तार; मुहूर्त ठरला, १२ जूनला 

Published On: Jun 09 2019 1:23AM | Last Updated: Jun 09 2019 1:23AM
बंगळूर : प्रतिनिधी

बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून 12 जून रोजी सकाळी 11.30 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. काँग्रेस?निजद युती सरकारच्या या मंत्रिमंडळात अपक्षांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे.  मुख्यमंत्र्यांनी शनिवारी (दि. 8) राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी 12 जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. असंतुष्ट आमदारांना पक्षातच रोखून धरणे, ऑपरेशन कमळला चालना मिळू नये, याची खबरदारी घेण्यासाठी आताचा मंत्रिमंडळ विस्तार महत्त्वाचा ठरणार आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचना किंवा मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांत चर्चा झालेली आहे. काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्यात यावी, असा सल्‍ला दिला होता. त्यामुळे मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार की, विस्तार होणार याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. पुनर्रचना झाल्यास पक्षातील असंतुष्टांना मोकळीक मिळेल आणि बंडाळी माजेल, या भीतीपोटी अखेर काँग्रेस हायकमांडने मंत्रिमंडळ विस्ताराला मान्यता दिली आहे. काँग्रेस आणि निजदमध्ये अनेक आमदार मंत्रिपद मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. 

अनेकांनी याबाबत जाहीरपणे आपली इच्छा व्यक्‍त केली आहे. अनेकांनी सरकारवर टीका करून आपली नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे एकाला मंत्रीपद दिले तर, दुसरा दुखावणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षातील कोणालाच मंत्रीपद द्यायचे नाही, असा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे. याचा फायदा अपक्ष आमदारांना होणार आहे. 

अपक्ष आमदार आर. शंकर आणि नागेश यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन ऑपरेशन कमळला शह देण्याचा आणि पक्षातील नाराजांना शांत करण्याचा डाव काँग्रेस व निजदच्या वरिष्ठांनी टाकला आहे.

अपक्षांना एक जागा देणार : निजद

सध्याच्या मंत्रीमंडळात काँग्रेसच्या 1 आणि निजदच्या 2 जागा रिक्‍त आहेत. युती सरकार टिकवण्यासाठी निजदच्या 2 पैकी एक जागा अपक्षांसाठी सोडण्याची तयारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दर्शवली आहे. तर काँग्रेसही अपक्षांना जागा देणार आहे. 

मागे घेतला होता पाठिंबा

अपक्ष आमदार आर. शंकर आणि नागेश यांनी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे दोघांनाही मंत्रीपद दिले होते. पण, त्यानंतर राजकीय समिकरणे बदलल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. आता पुन्हा सरकारला त्यांनी पाठिंबा दिला असून त्यांना मंत्रीपद देण्यावर शिक्‍कामोर्तब झाल्याचे समजते.