बेळगाव : प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांमध्ये देशात अराजकता माजली आहे. वर्तमान राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. सत्ताधार्यांकडून लोकशाहीला वाकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी केला.जीवन विवेक प्रतिष्ठान, कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ, समाजवादी प्रबोधिनी शाखा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी डॉ. खैरनार यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी अॅड. राम आपटे होते . व्यासपीठावर माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी होते.
डॉ. खैरनार म्हणाले, सत्ताधारी संसदीय लोकशाहीप्रणालीला नख लावण्याचे काम करीत आहेत. संसदेचे कामकाज दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. सत्ताधार्यांना संसद चालविणे महत्त्वाचे वाटत नाही. हुकूमशाहीवर अधिक भर देण्यात येत आहे. राष्ट्रपतींपासून अनेकांचे महत्त्व कमी करण्यात येत आहे. अनेक प्रथा खुंटीला टांगून ठेवण्यात येत आहेत.अर्थव्यवस्था डबघाईला आणण्याचे काम नोटाबंदीने केले आहे. प्रास्ताविक प्रा. आनंद मेणसे, सूत्रसंचालन अश्वत्थ कोल्हापुरे यांनी केले. अनिल आजगावकर यांनी आभार मानले.
गांधी ते अखलाक मारेकरी एक
देशात प्रतिगामी शक्ती झपाट्याने वाढत असून पुरोगामी शक्ती कमी पडत आहेत. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांच्या खुनापासून उत्तर प्रदेशात झालेल्या अखलाक पर्यंतचे मारेकरी एकच असून त्यांच्या हातात देशाची सत्ता असल्याचा आरोप डॉ. खैरनार यांनी केला.