Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › रेशनकार्डधारकांना ई-केवायसी सक्‍ती

रेशनकार्डधारकांना ई-केवायसी सक्‍ती

Published On: Jun 05 2019 1:27AM | Last Updated: Jun 04 2019 11:05PM
खानापूर : प्रतिनिधी

अनेक वर्षापासून बीपीएल- अंत्योदय रेशनकार्ड सदस्यांचे  अंगठ्याचे ठसे घेण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक कार्डधारक सदस्य खोटी माहिती देऊन दर महिन्यास रेशन घेऊन जात असतात. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्यास नुकसान सोसावे लागत आहे. यासाठी रेशनकार्डात नावे असणार्‍या सर्व सदस्यांचा अंगठ्याचा ठसा घेण्यात येणार आहे. यासाठी रेशनकार्डात नावे असणार्‍या सर्व कुटुंब सदस्यांना आता संबंधित रेशन दुकानात जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे.

खानापूर तालुक्यातील बीपीएल- अंत्योदय रेशनकार्डधारक सदस्यांची आता ई. - केवायसी (अंगठ्याचा ठसा) करावी लागणार आहे. मंगळवार दि. 3 पासून खानापूर तालुक्यातील 136 रेशन दुकानांतून हे काम होणार आहे. तालुक्यातील 2 लाख 7 हजार 989 रेशनकार्डधारकांची यामुळे  तारांबळ उडणार आहेे.  गेल्या काही वर्षापासून कार्डात नावे असणार्‍या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करण्यात आले आहेत. या आधारावरच आतापर्यंतचे धान्य वाटप करण्यात येत होते. 

कुटुंबातील निधन पावलेले सदस्य, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली तसेच अन्य कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले  कुटुंबातील सदस्य  यामुळे संख्या कमी झालेली असताना देखील असंख्य कार्डधारकांनी त्यांची नावे कार्डातून कमी केलेली नाहीत. याबरोबरच बर्‍याच नागरिकांच्या नावाने दोन-दोन रेशनकार्डही आहेत. यामुळे रेशनकार्डामधील सर्व सदस्यांचे आता ई- केवायसी करावी, असा रेशन दुकानदारांना अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने आदेश देण्यात आला आहे. प्रत्येक रेशन कार्डधारकांनी आपल्या सदस्यांसह रेशनकार्डासहित रेशन दुकानात जाऊन सर्वांनी अंगठ्याचे ठसे द्यावेत अशी विनंती   खानापूर तालुका अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी आर. सी. गट्टूमनी व राजश्री भरमाप्पगोळ यांनी केलीआहे. 

ई केवायसी करण्यासाठी प्रत्येक रेशनदुकानदारास मानधन मिळणार आहे.त्यासाठी कोणत्याही रेशनकार्ड धारकाने पैसे देण्याची गरज नाही.