Sat, Dec 14, 2019 05:39होमपेज › Belgaon › डॉ. प्रभाकर कोरे म्हणतात, आपल्यावरही पडला होता आयकर छापा

डॉ. प्रभाकर कोरे म्हणतात, आपल्यावरही पडला होता आयकर छापा

Published On: Mar 29 2019 1:36AM | Last Updated: Mar 28 2019 11:40PM
बेळगाव : प्रतिनिधी 

ज्याच्याकडे मोठी रक्कम असते, त्याच्यावर आयकर विभाग छापा टाकतो, माझ्यावरही आयकर छापा पडला होता, अशी कबुली गुरूवारी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. खासदार सुरेश अंगडींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ. कोरे, आमदार अभय पाटील, आमदार अ‍ॅड. अनिल बेनके गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांना पत्रकारांनी बंगळूरमधील कारवाईबाबात छेडले असता, डॉ. कोरेंनी ही कबुली दिली.  

आयकर विभाग काँग्रेस व धजदच्या नेत्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप होत असल्याचा प्रश्‍न एका पत्रकाराने विचारला. यावर डॉ. कोरे म्हणाले, ज्यांच्याकडे मोठी रक्कम आहे, त्यांच्यावर छापा पडतोच. याला निवडणूक अथवा पक्षाचा संबंध नसतो. कर्नाटकातील भाजपचे विद्यमान खासदार सिद्देश्‍वर यांच्यावरही आयकर छापा पडला होता. माझ्यावरही आयकर छापा पडला होता, असे सांगत अप्रत्यक्षरित्या आपल्याकडेही मोठी रक्कम आहे,  हे डॉ. कोरेंनी कबूल केले. तसेच  त्यांनी एका पत्रकाराला आयकर विभाग तुझ्या घरावर छापा टाकेल का? असा प्रतिप्रश्‍न केला. 

ते म्हणाले, कारवाईला निवडणुकीचा काहीही संबंध नाही. किमान वर्षभर एखाद्याची कुठे रक्कम आहे, कुठे स्थावर व जंगम मालमत्ता आहे, याचा सर्वतोपरी अभ्यास करून आयकर विभाग छापा टाकतो. आयकर विभाग म्हणजे केंद्राच्या हातातील बाहुले आहे, असे म्हटले जाते.  पण ते खरे नाही. कारण काँग्रेस सरकार असतानाही असेच म्हटले जायचे. हा डायलॉग काही नवीन नाही. 

मी शिस्तीचा शिपाई 

चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी तुमचे नावे होते. यावर डॉ. कोरे म्हणाले, चिकोेडीसाठी मी देखील मागणी केली होती. परंतु, अद्याप राज्यसभा सदस्यत्व एक वर्षे आहे. ती जागा रिक्त झाल्यास विरोधकांकडे जाईल, त्यामुळे तुम्हाला पुढच्या वेळी संधी देऊ, असे हायकमांडने सांगितले. मी पक्षाचा शिस्तप्रिय शिपाई आहे.  चिकोडीतून रमेश कत्ती व आण्णासाहेब जोल्ले यांच्यात तिकीटासाठी चुरस आहे. कोणालाही दिले तरी पक्षाचा शिपाई म्हणून  काम त्याच्या पाठीशी राहू.