Sun, Dec 15, 2019 03:15होमपेज › Belgaon › ऐक्याअभावी पुरोगामी चळवळीची हानी : डॉ. आ. ह. साळुंखे

ऐक्याअभावी पुरोगामी चळवळीची हानी : डॉ. आ. ह. साळुंखे

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 27 2019 12:00AM
बेळगाव : प्रतिनिधी

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मुख्य शत्रू ओळखला पाहिजे. ज्यांच्यापासून धोका आहे, त्यांच्याविरोधात संघटित संघर्ष केला पाहिजे. आपापसातील लहानसहान मतभेदांना तिलांजली देऊन प्रथम एकत्र यावे. पुरोगामी चळवळीची सर्वाधिक हानी ऐक्याअभावी झाल्याची खंत पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व बेळगावातील समविचारी पुरोगामी संघटनांच्यावतीने  डॉ. साळुंखे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब गोगटे रंगमंदिरामध्ये बुधवारी कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, सचिव सुभाष ओऊळकर, प्राचार्य टी. एस. पाटील (कोल्हापूर) होते.

बेळगावातील पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. साळुंखे यांचा घोंगडे, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, सध्याचा काळ प्रतिकूल आहे. अशा काळात पुरोगामी चळवळ पुढे नेण्याची आवश्यकता आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी नेटाने काम करावे लागेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावर विश्‍वास ठेवणार्‍यांनी एकत्र यावे लागेल. चार्वाक, लोकायत, बुद्ध यांचे तत्त्वज्ञान स्वीकारावे लागेल.तुकारामांचा वारसा जाणीवपूर्वक जपणे गरजेचा आहे.  देश एकीकडे महासत्ता होणार असल्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु देशातील 1 टक्के लोकांकडे 70 टक्के संपत्ती जमा होत आहे. 99 टक्के लोकांना 30 टक्के संपत्तीवर गुजराण करावी लागते. कुपोषणाने मुले मरत आहेत. माता बळी पडत आहेत. यातून देश महासत्ता बनणार नाही. भारतीय समाज सर्वांगाने बहरून यावा, यासाठी प्रयत्न करावे लागतील.

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य या विषयावरा प्राचार्य टी. एस. पाटील, म्हणाले, साळुंखे यांनी आयुष्यभर  समाजाला जागे करणारे लेखन केले. ज्या समाजाला वर्षानुवर्षे रुढी, परंपरा, धर्म, जातीच्या नावाने अडचणीत आणण्यात आले,  प्रगतीपासून रोखण्यात आले, त्यांना ज्ञानाचा, कर्तृत्वाचा वारसा सांगण्याचे काम केले. त्यांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कोणतेही लेखन खोडून काढता येत नाही. आमचे डोके आमच्याच धडावर राहील, यासाठी प्रबोधन केले. लेखन, वाचन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृत केला.

बेळगाव परिसरातील वेगवेगळ्या  पुरोगामी संघटनांतर्फे डॉ. साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सुरेश पाटील यांनी केले.  सुभाष ओऊळकर यांनी आभार मानले.

इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक

सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून तो जगभर नेला. त्यानंतर हा वारसा तुकारामांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यावर 150 चमत्कार खपविण्याचा प्रयत्न झाला आहे. कर्तृत्वाचा दिव्य वारसा न्यावा लागेल. यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. साळुंखे यांनी मांडले.