Sat, Dec 14, 2019 05:38होमपेज › Belgaon › पुणे-लोंढा रेल्वेमार्ग दुहेरीकरण 2021 पर्यंत पूर्ण करा

पुणे-लोंढा रेल्वेमार्ग दुहेरीकरण 2021 पर्यंत पूर्ण करा

Published On: Jun 08 2019 1:51AM | Last Updated: Jun 08 2019 12:50AM
बेळगाव : प्रतिनिधी

पुणे- मिरज- लोंढा रेल्वेमार्गाचे  दुहेरीकरण 2021 पर्यंत पूर्ण करा, असा आदेश रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शुक्रवारी नवी दिल्‍लीत रेल्वे भवनमध्ये झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत दिला. 

बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि बोर्डाचे सदस्य विश्‍वास चौबे, ट्राफिक कंट्रोलर विजयकुमार, सुशांत आदी उपस्थित होते. अंगडी यांनी यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी आढावा बैठक घेतली.  
पुणे- मिरज - लोंढा - हुबळी- दावणगिरी- तुमकूर रेल्वे मार्गाचे 2021 पर्यंत दुहेरीकरण पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना अंगडी यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणार्‍या दुहेरीकरणाचे काम गतीने करण्यात यावे, यासाठी संपादित करावी लागणारी जमीन शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती अंगडी यांनी दिली. या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठीही तात्काळ पावले उचलण्यात यावीत, अशा सूचनाही करण्यात आल्या.

यावेळी मंत्री अंगडी यांनी बंगळूर सब अर्बन रेल्वेच्या कामासंबंधीही माहिती घेतली. ही योजना केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार संयुक्‍तपणे राबवत आहे. बैठकीला बंगळूरचे खासदार पी. सी. मोहन उपस्थित होते. हा प्रोजेक्ट गतीने सुरु असून, वेळेत पूर्ण  करण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. 

हुबळी - अंकोला मार्गासाठी प्रयत्न

हुबळी - अंकोला रेल्वे मार्गासाठी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. त्याचा सर्व्हेही झाला आहे. कर्नाटक हद्दीतील वनविभागाची जमीन अद्याप या मार्गासाठी मिळालेली नाही. कर्नाटक शासनाने याची मंजुरी द्यावी, अशी मागणी रेल्वे अधिकार्‍यांनी केली. त्यानुसार कर्नाटक शासनाबरोबर चर्चा करण्यात  येईल, अशी माहिती अंगडी यांनी दिली.