होमपेज › Belgaon › मुस्लिमांच्या तक्रारी ऐकू नका : बसनगौडा पाटील 

मुस्लिमांच्या तक्रारी ऐकू नका : बसनगौडा पाटील 

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 08 2018 8:08PMविजापूर : प्रतिनिधी

मुस्लिमांच्या तक्रारी मुळीच ऐकू नका, असा सल्‍ला नगरसेवकांना देऊन भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बसनगौडा एस. पाटील यत्नाळ यांनी वादग्रस्त विधान केले आहे.  ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

भाजप नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील मुस्लिमांच्या तक्रारी ऐकू नयेत आणि त्यांची कामेही करु नयेत, असे त्यांना सांगितले असल्याचे पाटील यतनाळ यांनी म्हटले आहे. या वक्‍तव्याचा तीस सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. आमदारांच्या कार्यालयात बुरखाधारी महिला, पांढरी टोपी घातलेल्यांना अजिबात प्रवेश देऊ नये. असे कोणी मदत मागायला आल्यास त्यांना थेट संबंधित खात्यांच्या कार्यालयात पाठवावे, असेही पाटील यतनाळ यांनी म्हटले आहे.

मला मतदान करा असे कधीच मुस्लिमांना सांगितले नाही. हिंदूंच्या मतामुळे माझा विजय निश्‍चित होता. त्यामुळे मी ‘त्यांच्या’वर मुळीच अवलंबून नाही. कारण असे लोक निवडणूक काळात मतांसाठी पैसे मागायला येतात. पैसे घेऊनही ते   मतदान करतील, याचीही शाश्‍वती नसते, असे यतनाळ म्हणाले.

अशा विधानाबाबत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना छेडले असता पाटील यतनाळ म्हणाले, ‘तुम्ही मुस्लिम नेते असदूद्दीन ओवेसी यांना जाऊन विचारा, कारण तेच नेहमी वादग्रस्त विधाने करीत असतात. 
विजापुरातील बाजारपेठेमधील मुस्लिमांनी केलेली अतिक्रमणे हटविण्याचा आदेश संबंधित खात्यांना दिले आहेत. देशविरोधकांना धडा शिकविण्याची हीच वेळ आहे, असेही पाटील यतनाळ यांनी म्हटले आहे.

पाटील यांच्या विधानामुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ते वक्‍तव्य यत्नाळ यांचे वैयक्‍तिक आहे असे सांगून भाजपचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य चंद्रशेखर कवटगी यांनी हात झटकले आहेत.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, अशी वादग्रस्त विधाने करणारे पाटील यत्नाळ यांना आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही. अशी बेताल वक्‍तव्य करणार्‍यांनी घटनेचाच अवमान केला आहे.    - माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या