Fri, Jun 05, 2020 01:28होमपेज › Belgaon › कूपनलिकेसाठी अकराशे फुटांवर खोदाई !

कूपनलिकेसाठी अकराशे फुटांवर खोदाई !

Published On: May 17 2019 1:45AM | Last Updated: May 16 2019 11:29PM
बेळगाव : प्रतिनिधी

नदी, तलाव, डोह, तळी कोरडी पडली आहेत. आता जमिनीतून तरी पाणी उपसायचे म्हटले तर तेही शक्य नाही. भूजल पातळी घटल्याने 1100 फूट खोलवरही पाणी लागत नसल्याची स्थिती जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील काही गावांमध्ये निर्माण झाली आहे.

तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. जलस्रोतांकडून आता अपेक्षा करण्यात व्यर्थ आहे. कूपनलिकेतून पाणी मिळवण्यासाठी किमान 1100 फूट तरी खोदाई करावी लागत आहे. काही ठिकाणी तर 1300 फूट खोदाई केल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीत पाणी लागले तरी त्याची चव पिण्यालायक नसल्याचे दिसून येते.

बुद्नी खुर्द, के. तिम्मापूर, अवरादी, शिवपेठ, ओबळापूर एसएलटीसह काही गावांमध्ये समस्या तीव्र बनली आहे. लोकांनाच नव्हे तर जनावरांनाही पाणी मिळणे कठीण बनले आहे. एक घागर पाण्यासाठी काही किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. लहान मुले, वृद्धांची हेळसांड होत आहे. त्यांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत.

तोंडीकट्टी गावात पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बुदनीखुर्द गावातील आहेत. त्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले तरी ते अपुरे पडत आहेत. पण, त्याचवेळी पंचायत विकास अधिकार्‍यांनी याबाबत जास्त डोकेदुखी करुन घेतली नसल्याचे दिसून येते. मलप्रभा कालव्यातून पाणी आणण्यासाठी वाहिनी घालण्यात आली आहे. पण, तलावात पाणी आले नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे.

माजी आमदार अशोक पट्टण यांच्या काळात सुमारे 60 गावांना पाणी पुरवठ्याची बहुग्राम पाणीपुरवठा योजना जारी झाली. पण, ही गावे मलप्रभा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे नदीत पाणी असेल तरच या गावांना पाणी मिळते अन्यथा पाण्यासाठी वणवण करावी लागते.