Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › पावणे चार कोटींची घरपट्टी ऑनलाईन जमा

पावणे चार कोटींची घरपट्टी ऑनलाईन जमा

Published On: Jul 09 2019 1:11AM | Last Updated: Jul 08 2019 8:59PM
बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन घरपट्टी भरण्याबाबत शहरात महापालिकेतर्फे जागृती करण्यात आली आहे. यंदा तीन महिन्यांत एकूण  24 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. त्यापैकी पावणे चार कोटी रूपये जमा झाले आहेत. आगामी काळात यामध्ये चांगली भर पडेल, असा विश्‍वास महापालिकेला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात 39 कोटी रूपयांची घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात एकूण 1 लाख 26 हजार 480 मालमत्ता आहेत. त्यांच्याकडून ही घरपट्टी वसूल करण्यात येते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात घरपट्टीवर कोणताही दंड आकारण्यात येत नाही. पण, जूननंतर प्रत्येक महिन्याला दोन टक्के अशा प्रकारे कर आकारण्यात येतो. त्यामुळे अनेक लोक जून महिन्यापर्यंतच घरपट्टी भरत असतात. त्यानुसार यंदा पहिल्या तीन महिन्यातच निर्धारित उद्दिष्टाच्या निम्म्याहून अधिक घरपट्टी वसूल झाली आहे.

नागरिकांनी रांगेत थांबून घरपट्टी भरण्यापेक्षा ऑनलाईन घरपट्टी भरावी, असे आवाहन महापालिकेने वारंवार केले आहे. अनेक ठिकाणी मनुष्यबळाच्या कमरतेमुळे ऑनलाईन घरपट्टीसाठी आवाहन केले जाते. त्यामुळे यंदा पे?टीएमव्दारे 14 लाख 92 हजार 916 रूपयांची घरपट्टी जमा झाली आहे. तर क्रेडिट आणि डेबिट कार्डाव्दारे जूनअखेर 3 कोटी 58 लाख 25 हजार 806 रूपयांची घरपट्टी वसूल झाली आहे.

शहरात पाच ठिकाणी बेळगाव वन कार्यालये आहेत. त्याठिकाणीही घरपट्टी भरण्यात येते. त्याठिकाणीही चांगल्या पध्दतीने घरपट्टी जमा झाली आहे. त्यामुळे जून महिन्याअखेर महापालिकेकडे एकूण 23 कोटी 91 लाख 25 हजार 379 रूपयांची घरपट्टी वसूल झाली आहे.

ईडीसीव्दारे 85 हजार रूपये जमा

महापालिकेने 20 जूनपासून ईडीसी स्वाईप मशिनव्दारे प्रत्येक प्रभागात घरपट्टी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत 85 हजार 661 रूपयांची घरपट्टी जमा झाली आहे. मध्यंतरी स्वॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे काम बंद होते. पण, आता मशीनद्वारे कामाला गती आली आहे.

एक नजर
एकूण मालमत्ता :  1,26,480
घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट :  39 कोटी
जूनअखेर वसूल घरपट्टी: 23,91,25,379
ऑनलाईन जमा घरपट्टी:  3,74,04,383