बंगळूर : प्रतिनिधी
एकीकडे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत; तर दुसरीकडे सोमवारीच बहुमत सिद्ध करण्याच्या मागणीचा निर्णय विधानसभेचे विरोधी पक्षनेते बी. एस. येडियुराप्पा यांनी घेतला आहे. सभापतींनी मागणी मान्य केल्यास मुख्यमंत्री कुमारस्वामींना अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे.
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळाची सोमवारी बैठक असून यावेळी गैरहजर राहणार्यांवर कारवाईची शिफारस सभापतींकडे केली जाणार आहे. एमटीबी नागराज यांना बोलावून प्रदेश काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत घातली. राजीनामा मागे घेण्याची तयारी त्यांनी केल्याचे वृत्त पसरले होते. पण अखेर रविवारी स. 10.30च्या दरम्यान त्यांनी विशेष विमानाने मुंबई गाठली. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांचे स्वीय सहायक संतोष, आर. अशोक आणि यलहंकाचे आमदार एस. आर. विश्वनाथ यावेळी उपस्थित होते. नागराज यांना विमानापर्यंत सोडून ते परतले. या घटनेमुळे प्रदेश काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे. शनिवारी दुपारी 12च्या दरम्यान मंत्री डी. के. शिवकुमार यांनी नागराज यांचे घर गाठून त्यांची मनधरणी करून सिद्धरामय्यांच्या निवासात आणले होते. रात्री 11 पर्यंत सिद्धरामय्या व इतर नेते नागराज यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना अपयश आले.
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही सिद्धरामय्यांचे घर गाठून नागराज यांची भेट घेतली. रात्री उशिरा नागराज यांनी राजीनामा मागे घेणार असल्याचे सांगितले. पण, दुसर्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी त्यांनी निर्णय बदलल्याचे दिसून आले.
तत्काळ बहुमत सिद्धतेची मागणी : येडियुराप्पा
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तत्काळ पायउतार व्हावे. अन्यथा सोमवारी बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली जाणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते येडियुराप्या यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, आतापर्यंत सोळा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असून मुख्यमंत्र्यांनी पद सोडावे. सभापतींनी सभागृह सल्लागार समितीची बैठक बोलावली आहे. बैठकीत तत्काळ बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली जाईल. कोणत्याही कारणास्तव आता सरकार टिकणार नाही, याची जाणीव सर्वांना आहे. पण, आमदारांच्या राजीनाम्यांबाबत विनाकारण गोंधळ केला जात आहे. कुमारस्वामी यांना आता मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्याचा नैतिक हक्क नाही..
काँग्रेसचे अखेरचे प्रयत्न
काँग्रेस विधिमंडळाची बैठक सोमवारी सकाळी 9 वा. बोलावण्यात आली आहे. याआधीस सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आले आहे. बैठकीला हजर न राहणार्यांना तसेच अधिवेशनात गैरहजर राहणार्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली. बैठकीला न आल्यास संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाई करण्याची शिफारस विधानसभा सभापतींकडे केली जाणार आहे. सोमवारी किंवा बुधवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत सिद्ध करणार आहेत. यावेळी आमदारांची वर्तणूक कशी असावी, याविषयी बैठकीत चर्चा होईल. सरकार वाचवण्यासाठी आता अखेरची प्रयत्न सुरु झाले असून काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे आगमन बंगळुरात होणार आहे. बंडखोरांची मनधरणी करण्याचा अखेरचा प्रयत्न ते करणार आहेत.