Mon, Jan 20, 2020 09:21होमपेज › Belgaon › एचआयव्ही बाधितांच्या संख्येत घट

एचआयव्ही बाधितांच्या संख्येत घट

Published On: Dec 01 2018 1:04AM | Last Updated: Nov 30 2018 8:35PMबेळगाव : अंजर अथणीकर

जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांची संख्या घटत चालल्याचे आशादायक चित्र दिसत असून, बाधित होणार्‍या बाळांची संख्या जवळपास शुन्यावर आणण्यातही आरोग्य विभागाला यश आले आहे. त्याचबरोबर बाधितांसाठी आता अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांना सन्मानाची वागणूकही मिळत आहे. 

एड्स प्रतिबंधासाठी शासनाचे अनेक प्रयत्न सुरु असून, याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. दहा वर्षापूर्वी भयानक वाटणार्‍या असाध्य रोगाची आता भिती काढून टाकण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. पाच वर्षापूर्वी शासकीय दरबारी बेळगाव जिल्ह्यामध्ये एचआयव्ही बाधितांची संख्या 3 हजार 268 होती.  ती आता घटून 2 हजार 35 वर आली आहे.  जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या 2.8 वरुन 1.32 टक्क्यावर गेली आहे.

2010 पासून आज अखेर 2040 जन्म घेतलेल्या बाळांमध्ये केवळ 78 बाळांना ही बाधा झाली आहे.एचआयव्ही बाधितांची संख्या शासकीय नोंदीप्रमाणे 1.32 टक्के असली तरी याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र एचआयव्ही आता आवाक्यात येत चालला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. बेळगावमधील केंद्रामधून जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. शैलजा ताम्हण्णावर, समन्वयक वाय.एस. मुल्‍ला, पर्यवेक्षक के. एन. जहागीरदार, एम. एम. सनदी आदी काम पहात आहेत. 

सहा केंद्रामध्ये मोफत उपचार

एचआयव्ही बाधितांवर जिल्ह्यातील सहा एआरटी केंद्रांमध्ये मोफत उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये बेळगाव, सौंदत्ती, गोकाक, चिक्कोडी, अथणी आणि रायबागचा समावेश आहे. औषधोपचार एआरटी केंद्रात मोफत दिला जातो. महिन्याचे औषध एकाचवेळी दिला जातो.

बाधितांसाठी या सुविधा 

घरकूल योजना, मुलांसाठी सकस आहार योजना, कमी व्याजदरात व्यवसायासाठी कर्जपुरवठा आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर मोफतमध्ये कायदा सल्ला आणि त्यांच्या न्यायालयीन कामकाजासाठी मोफत वकील उपलब्ध करुन दिला जातो. औषधोपचाराला येण्या जाण्यासाठी प्रवास भत्ता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 

जिल्ह्यातील पाच वर्षातील एचआयव्ही बाधित, एकूण लोकसंख्येचे प्रमाण

2014 : 3.268      2.8
2015 : 2,729     1.9
2016 : 2, 395    1.7
2017 : 2,162    1.5
2018 : 2,035    1.32